Congress Nagpur : ‘त्या’ कृत्याचे काँग्रेस समर्थन करणार नाही: कुंदा राऊत | पुढारी

Congress Nagpur : 'त्या' कृत्याचे काँग्रेस समर्थन करणार नाही: कुंदा राऊत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा परिषदेच्या परिसरात लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजनांच्या बॅनरमधील फोटोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फासले. याच्या निषेधार्थ भाजप सोमवारी (दि.५) ठिय्या आंदोलन करणार आहे. तर या प्रकरणी संबंधितांवर कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी सांगितले. Congress Nagpur

त्या बॅनरमधील फोटोला अज्ञात काही लोकांनी येऊन काळे फासल्याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही प्रशासनाला फोन करून असे कृत्य कोणी केले, याची चौकशी करून उचित कारवाई करावी, असे निर्देश दिले. असे कृत्य करणाऱ्या लोकांचे नागपूर जिल्हा परिषदेचे कोणतेही पदाधिकारी व महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य समर्थन करणार नाहीत. पंतप्रधान हे कुठल्याही पक्षाचे नाहीत. तर ते देशाचे पंतप्रधान असून ते एका संवैधानिक पदावर बसलेले आहेत, असेही कुंदा राऊत यांनी स्पष्ट केले. Congress Nagpur

आमचे नेते राहुल गांधी हे एक विचाराची व न्यायाची लढाई देशपातळीवर लढत आहेत. माजी आमदार सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्हा परिषद लोकशाही, संविधानाची एक विचारधारा घेऊन नागपूर जिल्ह्यात काम करत असून आम्ही सतत अन्यायाविरोधात लढू. अन्यायाविरोधात आवाज उठवू, अशी भूमिका माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी व्यक्त केली.

यावेळी महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, समाज कल्याण सभापती मिलिंदजी सुटे, शिक्षण सभापती राजू कुसुंबे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, दिनेश बंग, संजय जगताप, सुनिता ठाकरे, छाया बनसिंगे, महिंद्रा डोंगरे, पंचायत समिती सभापती रूपाली मनोहर, दिशा चनकापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button