नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे तलाठी भरतीचा महाघोटाळा चर्चेत असतानाच आज बुधवारी (दि.१० ) रोजी महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला. यानंतर नागपुरातील सक्करदरास्थित कमला नेहरू महाविद्यालयात संतप्त विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. पेपर फुटल्यामुळे नागपुरात परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राज्यात इतरही काही ठिकाणी हेच चित्र पहायला मिळाल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या
नागपूरमध्ये पीएचडी फेलोशिप ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या परीक्षेचे संपूर्ण पेपर पहिलेच फुटेलेले होते. यामुळे विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याचा आरोप संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे. पेपर फुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. सर्व विद्यार्थांनी कमला नेहरू महाविद्यालयावरील मैदानात आंदोलन केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
नागपूर आणि पुण्यात अशी पेपर फुटीची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राज्यभरात पडसाद उमटले आहेत. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. दोन वेळा पेपर फुटल्यामुळे सरकारने आमची सरसकट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी आता या संतप्त विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.