ना मोदी, ना फडणवीस पुणे लोकसभेसाठी भाजपाचे हे नाव आहे जास्त चर्चेत

ना मोदी, ना फडणवीस पुणे लोकसभेसाठी भाजपाचे हे नाव आहे जास्त चर्चेत
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत आल्याने पुण्यातील भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली. भाजपचे काही इच्छुक पुण्यात निवडणुकीची तयारी करत आहेत. पुणे हा भाजपच्या दृष्टीने सुरक्षित मतदारसंघ मानला जात असल्याने, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही पुढे आले. मात्र, फडणवीस यांनी स्वतःच ती चर्चा नाकारली. भाजपकडून राज्यसभेतील वरिष्ठ आजी- माजी केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची चर्चा आहे. त्यामध्ये जावडेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हेही पुण्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही गेले काही दिवस मतदारांच्या भेटीगाठी घेत मतदारसंघाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

माजी महापौर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, तसेच पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि वडगावशेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक हे दोघे प्रमुख इच्छुक असून, त्यांनीही विविध कार्यक्रम आयोजित करत जोरदार तयारी सुरू केली आहे. या तीन प्रमुख इच्छुकांव्यतिरिक्त आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाचीही चर्चा अधूनमधून भाजप कार्यकर्त्यांत सुरू असते.

भाजपच्या नेत्यांची राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील आढावा आणि नियोजनाची बैठक दोन दिवसांपूर्वी पुण्यात झाली. त्या बैठकीला जावडेकर आणि मोहोळ उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. सुभाष यांनी यावेळी दिवसभर राज्यातील मतदारसंघांचा आढावा घेतला. भाजपने नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांसह 21 खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्याच धर्तीवर लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मंत्र्यांना निवडणूक लढविण्यास सांगण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत असून, राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पद भुषविलेल्या काहीजणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबत भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये गांभीर्याने चर्चा सुरू आहे. त्यामध्ये नारायण राणे, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्या नावाची चर्चा झाली.

भाजप निवडणूक तयारीच्या बाबतीत त्यांच्या विरोधी पक्षापेक्षा खूपच आघाडीवर आहे. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात बूथपातळीपर्यंत कार्यकर्त्यांची बांधणी केली आहे. उमेदवार निवडीबाबतही ते धक्कातंत्राचा वापर करत आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या नावाबाबत कार्यकर्त्यांना अंदाज बांधता येत नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणवले. भाजपच्या नवीन कार्यालयानिमित्त आयोजिलेल्या स्नेहमेळाव्यातही कार्यकर्ते याच बाबत चर्चा करत असल्याचे दिसून आले.

जावडेकर हे पुण्यात गेली पाच दशके कार्यरत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दोनदा विधानपरिषदेवर निवडून गेले, तर राज्यसभेचे अठरा वर्षे खासदार आहेत. त्यांनी राज्य आणि देशपातळीवरील राजकारणावरच भर दिला असून, त्यांनी स्थानिक राजकारणात कधी फारसे लक्ष घातले नाही. त्यांची राज्यसभेची मुदत यावर्षी संपणार आहे.

पुण्यात लोकसभेसाठी काँग्रेसकडून 20 जण इच्छुक

पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये वीस जण इच्छुक असून, त्यांचे अर्ज काँग्रेसभवनात दाखल झाले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी उपमहापौर आबा बागूल, संगीता तिवारी, दत्ता बहिरट, नरेंद्र व्यवहारे यांनीही पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना पक्षाकडे अर्ज देण्यास सांगितले होते. त्यावेळी वीस जणांनी अर्ज दिले. त्यांची नावे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मंगळवारी जाहीर केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news