Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहातून सुटका; समर्थकांकडून जल्लोषात स्वागत | पुढारी

Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहातून सुटका; समर्थकांकडून जल्लोषात स्वागत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज (दि.१०) दुपारी त्यांची मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी त्यांचे केदार समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी केदार यांनी समर्थकांना विजयाचे चिन्ह दाखवत अभिवादन स्वीकारले. Sunil Kedar

आज दुपारी केदार यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बराच वेळ मध्यवर्ती कारागृहापासून सीताबर्डी परिसरात वाहतूक खोळंबली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५३ कोटींच्या रोखे घोटाळ्यात ५ वर्षे शिक्षा सुनावल्यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केदार यांना जामीन मंजूर केला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. Sunil Kedar

या निर्णयानंतर आज केदार कारागृहातून बाहेर आले. जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यासह कुटुंबीय, केदार समर्थकांनी फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले. सिव्हिल लाईन्सस्थित निवासस्थानी पोहोचेपर्यंत काँग्रेस, मविआतर्फे ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. सावनेर विधानसभा मतदारसंघात देखील ठिकठिकाणी बॅनर लावून जामीन निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली, त्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला. राज्य सरकारने जामीन अर्जाला विरोध केला होता. केदार यांच्या बाजूने वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला. तर राज्य सरकारकडून राजा ठाकरे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा 

Back to top button