ताडोबा अभयारण्य : ताडोबातील पारंपरिक वन्यप्राणी प्रगणनेला वनरक्षक वनपालांचा कडाडून विरोध

ताडोबा अभयारण्य : ताडोबातील पारंपरिक वन्यप्राणी प्रगणनेला वनरक्षक वनपालांचा कडाडून विरोध
Published on
Updated on

व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिध्द चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य येथे वन्यप्राणी प्रगणनेकरीता कर्तव्यावर असताना काल शनिवारी सकाळी आठच्या सुमारास माया वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षक स्वाती एन. ढोमने यांच्या दुर्दवी मृत्यूनंतर वनरक्षक, वनपाल व इतर वन कर्मचारी संघटनांमध्ये प्रचंड संताप उसळलेला आहे.

जुन्या पारंपारीक पध्दतीने वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली वन्यप्राणी प्रगणना करण्यास वनरक्षक व वनपालांनी प्रचंड कडाडून विरोध केला आहे. स्व:रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा देण्यात यावी, असी मागणी केली आहे. त्यांच्या प्रखर विरोधानंतर ताडोबा अभयारण्य व्यवस्थापनाला अखेर वन्यप्राणी प्रगणना थांबवावी लागली आहे.

19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पाणवट्यावर वन्यप्राणी प्रगणना होऊ घातलेली आहे. तत्पूर्वी होऊ घातलेल्या वन्यप्राणी प्रगणनेकरिता ट्राँझिस्ट लाईन टाकरण्यात आली आहे. दरम्यान काल शनिवारी ताडोबा व्याघ्र अभियारण्यात कोलारा गेट जवळील कक्ष क्रमांक 97 मध्ये पाणवट्यावर सकाळी आठच्या सुमारास ट्राँझिस्ट लाईन द्वारे आपल्या तीन सहकाऱ्यासह पायी जात असलेल्या वनरक्षक स्वाती एन. ढोमने यांचेवर माया नावाच्या वाघिणीने आडोशाला जावून प्राणघातक हल्ला केला.

काही अंतरापर्यंत ओढत नेऊन तिचा बळी घेतला. व्याघ्र अभयारण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वनरक्षकावर हल्ला करून जीव घेतल्याचा थरार काल शनिवारी (20 नोव्हेंबर 2021) ताडोबात घडला आहे. शनिवारीच सायंकाळी चिमूरात शवविच्छेदन पार पाडल्यानंतर वनविभागाच्या कार्यालयात स्वाती ढोमने यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चिमुरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेने सर्वत्र हळहळ  व्यक्त केली जात आहे.

या घटनेत वन्यप्राणी प्रगणनेच्या पहिल्याच दिवशी सकाळी एका महिला वनरक्षकाचा दुर्दवी मृत्यू झाल्याने वनरक्षक, वनपाल व इतर वनकर्मचारी संघटनांमध्ये संताप उफाळून आला आहे. शनिवारच्या घटनेत शहीद झालेल्या महिला वनरक्षकाच्या मृत्यूमुळे वनरक्षक, वनपाल व वनकर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून प्रचंड भिती निर्माण झाली आहे. किंबहुना या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वनरक्षक संघटनेने वर्तविली आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर पर्यंत होऊ घातलेली प्रगणना ही तातडीने थांबवून फेब्रुवारी किंवा मार्च महिण्यात घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर मागणीचे गांभिर्य आणि महिला वनरक्षकासोबत घडलेली घटना बघता ताडोबा व्यवस्थापनाने कर्मचारी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून वन्यप्राणी प्रगणना थांबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. वन्यप्राणी प्रगणना करताना वनरक्षक किंवा वनपाल यांना सकाळी साडेसहा ते दहाच्या सुमारास ट्राँझिस्ट लाईनवर पायी चालावे लागते. ही वेळ अयोग्य असून ती दहाच्यानंतरची करण्याची सुचना वनरक्षकांनी केली आहे. शिवाय मांसभक्षी प्राण्यांच्या शोधार्थ प्रगणनेत सुमारे 15 किमी पायी चालावे लागते ही पध्दती परंपरागत आणि धोकादायक असल्याने ती बंद करण्याची मागणी केली आहे.

याऐवजी ट्रॅप कॅमेराद्वारे ही प्रगणना करण्यात यावी असा पर्याय  सुचविण्यात आला आहे. संपूर्ण नियत वनरक्षकास दैनंदिन गस्तीकरिता दोन बिट मदतनीस व इतर संवेदनशील कामाच्या वेळी पाच मदनतीस उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे वनरक्षककांचे म्हणणे आहे. वनकर्मचाऱ्यांना जंगल गस्तीच्या वेळी स्व:रक्षणार्थ शस्त्र पुरवठा करण्याची महत्वाची मागणी ताडोबा व्यवस्थापनाकडे करण्यात आल्यात माहिती सुत्रांनी दिली आहे. क्षेत्रीय कर्मचारी वनकर्तव्यावर असताना  मृत्यू पावल्यास वनशहिदांचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

शिवाय सैनिक पोलिसांप्रमाणे वनकर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना भरघोष मदत देण्याची मागणी करून ताडोबा अभयारण्य व्यवस्थापनाकडे याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. सध्या स्थितीत ताडोबातील वन्यप्राणी प्रगणना ताडोबा व्यवस्थापनाने थाबविण्याचा निर्णय घेतला असला तरी भविष्यात ही प्रगणना वनाधिका-यांच्या माध्यमातून होते  की काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्या जावू  शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news