India vs New Zealand : न्यूझीलंडचा 3-0 ने धुव्वा

India vs New Zealand : न्यूझीलंडचा 3-0 ने धुव्वा
Published on
Updated on

कोलकाता ; वृत्तसंस्था : टी-20 विश्वचषकातील पराभवाचा काहीअंशी वचपा काढताना (India vs New Zealand) भारताने न्यूझीलंडला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यांत भारताने न्यूझीलंडवर 73 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने पहिला टी-20 पाच विकेटस्ने आणि दुसरा सामना 7 विकेटस्ने जिंकला होता.

कर्णधार रोहित शर्माच्या 56 धावा आणि शेवटी दीपक चहरने (8 चेेंडूंत 21 धावा) केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 20 षटकांत 7 बाद 184 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचे फलंदाज 17.2 षटकांत 111 धावांवर ढेपाळले. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 9 धावांत 3 बळी घेतले. तर, हर्षलला 2 बळी घेता आले. अक्षर पटेल याला 'सामनावीर' तर रोहित शर्माला 'मालिकावीर'चा पुरस्कार देण्यात आला. व्यंकटेश अय्यरने या सामन्यात पहिल्यांदाच गोलंदाजी केली. अ‍ॅडम मिल्ने हा त्याचा पहिली शिकार ठरला.

भारताच्या 184 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 'पॉवर प्ले'मध्येच तीन विकेटस् गमावल्या. अक्षर पटेलने किवींजना हे धक्के दिले. त्याने डॅरेल मिचेल (5), मार्क चॅपमन (0) आणि ग्लेन फिलिप्स (0) यांना बाद केले. हे तिघे बाद झाले तरी मार्टिन गुप्टिल मात्र अनस्टॉपेबल होता. त्याने 33 चेेंडूंत अर्धशतक गाठले; पण तो त्यात एका धावेची भर घालून बाद झाला. (India vs New Zealand)

चहलने त्याचा बळी घेतला. यानंतर टीम सैफर्ट (17) आणि लॉकी फर्ग्युसन (14) वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यांचा संपूर्ण डाव 17.2 षटकांत 111 धावांत संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलने 3 तर हर्षल पटेलने 2 विकेटस् घेतल्या. दीपक चहर, यजुवेंद्र चहल आणि व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी एकेक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, रोहितने सलग तिसर्‍यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. के. एल. राहुलऐवजी संधी मिळालेल्या इशान किशनसोबत रोहित शर्माने सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी फलकावर लावली. दोघांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू लागला; पण मिचेल सँटेनरने सातव्या षटकात किशन (29) आणि सूर्यकुमार यादव (0) यांना तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतलाही (4) मोठी खेळी करता आली नाही. दुसर्‍या बाजूला स्थिरावलेल्या रोहितचेही संतुलन ढासळले आणि तो संघाचे शतक फलकावर लावून तंबूत परतला. फिरकीपटू ईश सोढीने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

रोहितने 3 चौकार आणि 6 षटकारांसह 56 धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी छोटी भागीदारी रचली. व्यंकटेशने 20 तर अय्यरने 25 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हर्षल पटेलने 18 धावांचे योगदान दिले. तर, शेवटच्या षटकात दीपक चहरने 21 धावांची खेळी केली. 20 षटकांत भारताने 7 बाद 184 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सँटेनरने सर्वाधिक 27 धावांत 3 बळी घेतले. (India vs New Zealand)

'सिक्सर किंग' रोहित

* रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 षटकारांचा पल्लाही ओलांडला. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलनंतर असा पराक्रम करणारा रोहित जगातला दुसरा फलंदाज ठरला.

* कसोटीत 50 हून अधिक, वन-डेमध्ये 100 हून जास्त व टी-20 त 150+ षटकार नावावर असणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला.

* कर्णधार म्हणून रोहितने टी-20 त 50 षटकारांचा विक्रम केला. विराट कोहलीनंतर (59) हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news