Hain Taiyaar Hum: देणगीसाठी काँग्रेसची अभिनव शक्कल, खुर्चीवर क्यूआर कोड | पुढारी

Hain Taiyaar Hum: देणगीसाठी काँग्रेसची अभिनव शक्कल, खुर्चीवर क्यूआर कोड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: स्थापना दिनाच्या ‘है तैय्यार हम’ महारॅलीच्या माध्यमातून आज (दि.२८) गुरुवारी काँग्रेस देशात सत्ता परिवर्तनाची हाक देत नागपुरातून लोकसभा-२०२४ निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या निमित्ताने प्रतिस्पर्धी भाजपला नागपुरातूनच आव्हान देण्याचे काँग्रेस पक्षाचे प्रयत्न असून गेल्यावेळी आर्थिकदृष्ट्या भाजपसमोर कमकुवत ठरल्याने यावेळी देणगीसाठी अफलातून शक्कल शोधून काढण्यात आली आहे. (Hain Taiyaar Hum)

नागपुरातील दिघोरी टोल नाका परिसरातील भारत जोडो मैदान येथे 2 लाख खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या खुर्च्यांवर 138 वर्षांपासून सर्वोत्तम भारत निर्मितीसाठी केलेल्या काँग्रेसच्या संघर्षाचा उल्लेख करताना भारतासाठी आपल्या योगदानाची, काँग्रेसला आपली गरज असल्याचे आवाहन करीत क्यूआर कोड दिला आहे. 138 व्या वर्धापनदिन निमित्ताने 138, 1380,13800 या प्रमाणात अधिकाधिक डोनेशन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वाधिक देणगी देणाऱ्या 5 दानदात्यांचा स्वतः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते देणगी प्रमाणपत्र देऊन कार्यक्रम स्थळी सत्कार केला जाणार आहे. अर्थातच संघ मुख्यालयी होत असलेल्या या ऐतिहासिक जाहीर सभेत काँग्रेसला सर्वाधिक देणगी देणारे कोण ? याविषयीची उत्सुकता आता कायम आहे. (Hain Taiyaar Hum)

मोठा गाजावाजा झालेल्या या महारॅलीत सोनिया गांधी,प्रियंका गांधी येणार नाहीत असे समजल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असला तरी देशभरातून आलेले नेते,पदाधिकारी यांना भेटण्यासाठी, फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. है तय्यार हम…गीताने वातावरण निर्मिती केली जात होती.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे नागपुरात दाखल झाले आहेत. (Hain Taiyaar Hum)

हेही वाचा:

Back to top button