पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. त्यापैकी २३ जागांची उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची (UBT) मागणी काँग्रेसने फेटाळून लावली आहे, असे एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. याबाबतचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Congress On Uddhav Sena)
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीमधील पक्षांमध्ये जागा वाटपावर बैठक झाली. या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) गटाचे नेते सहभागी होते. दरम्यान, बैठकीत जागा वाटपावर नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभेसाठीच्या २३ जागांची मागणी फेटाळली आहे. (Congress On Uddhav Sena)
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी २३ जागांवर दावा केला आहे, पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने बहुसंख्य सदस्य आहेत. पक्षाच्या विभाजनामुळे उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठे आव्हान आहे, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात स्थिर मतांचा मोठा जुना पक्ष हा एकमेव पक्ष काँग्रेस असल्याचे देखील या बैठकीतील काँग्रेस प्रतिनिधींनी स्पष्ट केले. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, पक्षांमध्ये समायोजनाची गरज आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी, शिवसेनेची २३ जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त होती, असेही काँग्रेसने स्पष्ट केले.
पुढे काँग्रेसचे संजय निरुपम म्हणाले की, नेत्यांनी जागा जिंकण्यावरून संघर्ष टाळावा. शिवसेना 23 जागांची मागणी करू शकते, पण त्यांचे ते काय करणार? शिवसेनेत फूट पडल्याने नेते सोडून गेले, त्यामुळे संकट निर्माण झाले आहे. उमेदवारांची कमतरता ही शिवसेनेसाठी मोठी अडचण बनली आहे, असेही ते म्हणाले.
२०१९ मध्ये, अविभाजित शिवसेना भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आता MVA चा भाग आहे, ज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समावेश आहे. जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे आणि इतर ४० आमदारांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले, ज्यामुळे पक्षात फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केले.