

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी सादर केलेल्या जामिन अर्जावर आज (दि.२६) दुपारी तीननंतर युक्तिवाद झाला. शिक्षेला स्थगिती संदर्भात दोन्ही बाजूनी युक्तिवाद बराच वेळ झाला. मात्र, निर्णय बुधवारवर गेला आहे. यामुळे जेएमएफसी कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर उद्या जिल्हा सत्र न्यायालय जामीन देणार का ? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.
152 कोटींच्या रोखे घोटाळा प्रकरणी शिक्षेनंतर विलंब झाल्यामुळे त्यादिवशी अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्यात. त्यामुळे आज (दि. २६) सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एस. भोसले (पाटील) यांच्या न्यायालयापुढे केदार यांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५ वर्षे शिक्षा सुनावलेले सुनील केदार यांच्यावर अतिदक्षता विभागा (आयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी केदार यांचा एमआरआयचा अहवाल नॉर्मल आला. परंतु क्रिएटिनीन वाढल्याने त्यांची 'सीटी अँजिओग्राफी' पुढे ढकलण्यात आली. ती पुन्हा करून सामान्य आल्यावरच त्यांची अँजिओग्राफी करुन त्यांना मेडिकलमधून सुटी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकंदरीत केदार यांची प्रकृती लक्षात घेता रुग्णालयामध्ये त्यांचा मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी व सामान्य जनतेची बँक म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (एनडीसीसी) रोखे घोटाळ्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षाच्या कारावासाची आणि १२.५० लाख दंडाची शिक्षा ठोठविली आहे. शिक्षा सुनाविल्यानंतर केदार यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना घशात संसर्ग, मायग्रेनचा त्रास आणि ईसीजीमध्ये 'हार्ट रेट' कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले.
हेही वाचा