गोंदिया पुढारी वृत्तसेवा : गोंदिया शहरातील कापड व्यापारी अनंत जैन याच्या घरी शनिवारी नागपूर पोलिसांनी छापामार कारवाई केली. यावेळी १० कोटी रोख आणि २ किलो सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले. अनंत जैन याने नागपूरच्या एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनंत जैन पसार झाला आहे. (Gondia News)
गोंदियाचा रहिवासी आरोपी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने त्याच्या साथीदारासह नागपूर येथील तक्रारदाराला ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून एका तासात 2 कोटी रुपये कमावण्याचे आमिष दाखविले. याला तक्रारदार बळी पडला. आरोपीने त्याला ऑनलाइन बेटिंग/गेमिंग लिंकचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड पाठविले. आरोपी अनत उर्फ सोंटू याने फिर्यादीला ऑनलाइन लिंक पाठवून सट्टेबाजीची सवय लावली. वारंवार पैसे देवून देखील त्याला तक्रारकर्त्याला लाभ झाला नाही. उलट तो कर्जबाजारी झाला. त्यानंतर आपल्याला बनावट ॲप तयार करून दिली.
आरोपी अनंत जैन आणि त्याचा साथिदार आपली फसवणूक करत असल्याचे समजल्यानंतर त्याने अनंत जैन याच्याशी संपर्क करून पैसे परत मागितले.अनंत जैन याने त्यालाच जीवे मारण्याची धमकी देत साथीदाराच्या मदतीने खंडणी मागितली. त्यानंतर तक्रारकर्त्याने नागपूर शहर पोलिस पोलिस ठाण्यात अनंत जैन याच्याविरोधात 58 कोटी 42 लाख 16 हजार 300 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार 21 जुलै रोजी दाखल केली हाेती. आरोपीविरोधात नागपूर सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 420, 468, 386, 120 (ब), 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर व गुन्हे विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने गोंदिया पोलिसांच्या मदतीने आज शनिवारी शहरातील सिव्हील लाईन येथील अनंत जैन याच्याघरी छापामार कारवाई केली. यावेळी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या पोहोचण्यापूर्वीच आरोपी अनंत जैन फरार झाला. आरोपीच्या घरातून पोलिसांनी १० कोटी रुपयांची रोकड आणि 2 किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. अद्यापही पोलिसांची झाडाझडती सुरू आहे.
आरोपी अनंत जैन याच्या घरी नागपूर आणि गोंदिया पोलिसांचे पथक सकाळीच दाखल झाले. मोठ्या प्रमाणात अनंत जैन याच्या घराच्या भोवती पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे. तर्कवितर्कांना उधाण आले. पोलिसांनी छापामार कारवाई दरम्यान अनंत जैन याच्या घराची झडती घेतली. दरम्यान सुमारे 10 कोटी रुपयांची रोकड हाती लागली. त्या नोटा मोजण्यासाठी दोन मशिन मागविण्यात आल्या हाेत्या.
हेही वाचा