युपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेचा ३ दिवसात निकाल -‘महाज्योती’ | पुढारी

युपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेचा ३ दिवसात निकाल -‘महाज्योती’

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – ओबीसी, व्हिजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर संस्थेमार्फत नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी (युपीएससी) प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा प्रारूप निकाल बैठक क्रमांकानुसार प्रसिद्ध केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून विद्यार्थ्यांचे आक्षेप सुद्धा महाज्योतीतर्फे मागविण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या –

या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी नव्याने काही प्रश्नांच्या उत्तरावर आक्षेप घेतलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सेट-२ चा समावेश आहे. या सर्व आक्षेपाचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या ३ दिवसांमध्ये ज्या प्रश्नांबाबत संदिग्धता आहे. त्या प्रश्नांची सुधारित उत्तरे प्रसिद्ध करून सुधारित निकाल लावल्या जाईल. त्यानंतर संवर्गनिहाय मेरिट यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी संभ्रम ठेवू नये, महाज्योतीचे आवाहन 

कोणत्याही विद्यार्थ्यांची हाती आलेली संधी निघू नये, केवळ माहिती भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याची परिपूर्ण काळजी महाज्योतीद्वारे घेतली जात आहे. येत्या ३ दिवसांमध्ये निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button