Hingoli Rain: हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पिके पाण्याखाली | पुढारी

Hingoli Rain: हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पिके पाण्याखाली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आज (दि.२७) पहाटे अडीचच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान झाले. तर रब्बी पिकांना काही प्रमाणात दिलासा तर काही प्रमाणात फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. Hingoli Rain

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या काळात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा उत्पन्न घटले. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात व शेवटच्या काळात पाऊस लांबणीवर गेला. आता हिवाळा सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रीच काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. मात्र, मध्यरात्रीपासून काही भागात पावसाचा जोर वाढला. Hingoli Rain

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, पुसेगाव, पानकनेरगाव आदी भागात पाऊस झाला. विजांचा प्रचंड कडकडाट होत होता. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव, दिग्रस कराळे, नरसी नामदेव परिसरातही पावसाने हजेरी लावली. काही भागात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. तर नाल्यांना व ओढ्यांना चांगलेच पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळाले. वसमत तालुक्यात कवठा, कुरुंदा, हट्टा या परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे खरिपातील कापूस तूर या पिकांसह रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली गेल्याने मोठा फटका बसला आहे. यामुळे साखर कारखान्याची ऊस वाहतूकही बंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील विविध भागात पावसामुळे रब्बी व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button