चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्या मंगळवारी (दि.२८) देखील प्रादेशिक हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित केल्यामुळे धान उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या खरीपातील हंगाम शेवटचे टप्प्यात तर रब्बी पिकाची लागवड होत आहे. अशातच आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आज सकाळपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे रब्बी आणि खरीप हंगामातील दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील नागभीड ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, चिमूर, चंद्रपूर तालुक्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्यस्थितीत धान शेवटच्या टप्प्यात म्हणजे कापणी व बांधणीचा हंगाम सुरू आहे. मध्यम स्वरूपाची धानपीक काढून झाले आहे. तर जड स्वरूपाच्या पिकांची कापणी व बांधणी सुरू आहे. ठिकठिकाणी कळपा बाध्यांमध्येच पडून आहेत. सोबतच रब्बी पिकांमध्ये चना, जवस, गहू, तूर पिकाची काही ठिकाणी लागवड झाली आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. ह्या दोन्ही पिकांवर अवकाळी पावसाचे संकट आहे.
राजुरा, कोरपना, वरोरा, बल्लारपूर, जिवती, भद्रावती, पोंभूर्णा आदी तालुक्यात सोयाबीन, कापूस आणि आंतरपीक म्हणून तूरीची लागवड केली जाते. सध्या सोयाबीन पिक निघालेले आहे.
शेतकरी अद्याप सावरला नसताना पुन्हा अवकाळीचे संकट
मोझॅक रोगामुळे सोयाबीन हातून गेले. आता शेतात कापूस पीक उभा आहे. कापूस वेचणीला आला आहे. दरम्यान आज सकाळी दहा वाजल्यापासून चंद्रपूरसह कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक भागात दमदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आंतरपीक तूरीलाही फटका बसण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या नुकसानीतून शेतकरी अद्याप सावरला नसताना पुन्हा अवकाळीचे संकट शेतकऱ्यांवर चालून आल्याने शेतकरी घाबरला आहे.
कापलेल्या धानाची होणार नासाडी
हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या धानपिकाची कापनी झाली आहे. शेतात पुंजने तयार करण्यात आलेले आहेत. सध्या जड धानाची कापणी आणि बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी शेतात धान कापली आहेत. कळपा शेतात पडून आहेत. अशातच अवकाळी पाऊस कोसळत असल्याने कळपाची नासाडी होण्याची शक्यता आहे. धान उत्पादक भागात आज हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कळपा वाळून भारे बांधण्यास अडचण येणार आहे. सोमवारी हलक्या सरी कोसळल्या परंतु उद्या मंगळवारी प्रादेशिक हवामान विभागाने येलो अलर्ट घोषित केला आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. एकीकडे अद्यापही सरकारी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. धानाला भाव नाही. त्यातच धान पिकांवर अवकाळी पाऊस गेल्यास धान विक्रीला अडचण निर्माण होवून कवडीमोलाने भावाने धान विकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.