यवतमाळ: पांढरकवडा बाजार समितीच्या गोदामात आढळली सुगंधी तंबाखूची १२ पोती | पुढारी

यवतमाळ: पांढरकवडा बाजार समितीच्या गोदामात आढळली सुगंधी तंबाखूची १२ पोती

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रुंझा येथील गोदामात सुगंधी तंबाखूची १२ पोती बेवारस स्थितीत आढळून आली आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तक्रारीनंतर पांढरकवडा पोलिसांनी हा तंबाखूचा साठा ताब्यात घेतला आहे. तंबाखू गोदामात कुणी ठेवला, याचा शोध पांढरकवडा पोलिस घेत आहेत. पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे रुंझा येथे गेल्या अनेक वर्षांपासून गोदाम आहे. हे गोदाम गरजू शेतकऱ्यांना भाड्याने दिले जाते. या गोदामातील एक लहान खोली गेल्या काही दिवसांपासून रिकामी होती. ती भाड्याने देण्यासाठी समितीचे कर्मचारी या गोदामात आले असता, त्या खोलीला वेगळेच कुलूप लागून दिसले. खिडकीच्या फटीतून डोकावून पाहिल्यानंतर खोलीत भरलेली पोती दिसून आली.

हा गैरप्रकार समितीच्या लक्षात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुरेश खांदककर यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नितीन सुशिर, जमादार कुंटावार, विजय राठोड आणि राजेश सुरोशे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर सुगंधित तंबाखूने भरलेली १२ पोती ताब्यात घेतली.

हेही वाचा 

Back to top button