गडचिरोलीत २६ नक्षल्यांचा खात्मा; जहाल नेता मिलिंद तेलतुंबडेही झाला ठार - पुढारी

गडचिरोलीत २६ नक्षल्यांचा खात्मा; जहाल नेता मिलिंद तेलतुंबडेही झाला ठार

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा

आज (दि. १३) सकाळी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-मरदिनटोला परिसरातील जंगलात पोलिस-नक्षल चकमक झाली. यात २६ नक्षलवादी ठार झाले असून, ३ पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. या चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

नक्षलवाद्याच्या मोठ्या कंमाडर पैकी एक म्हणून मिलिंद तेलतुंबडे याची ओळख आहे. त्याच्यावर ५० लाखांच बक्षीस लावलं गेलं होत. या चकमकीत नक्षल्यांचे जहाल नेते मिलिंद तेलतुंबडे, विजय रेड्डी आणि जोगन्ना मारले गेल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, पोलिसांकडून यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढारीला सांगितले की, तेलतुंबडे मारला गेल्याचे इतक्यात खात्रीने सांगता येणार नाही. अजून मृतदेहांची ओळख पटायची आहे.

आज पहाटे सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे जवान संयुक्तपणे छत्तीसगड सीमावर्ती भागातील बोटेझरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना साडेपाच वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्य सापडले आहे. २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत, शिवाय ३ पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला पाठविण्यात आले आहे, या चकमकीत नक्षवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

३ वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आज पोलिसांनी २६ नक्षल्यांना ठार केले. मागील तीन वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. २२ एप्रिल २०१८ ला भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यात साईनाथ, शिनू हे मोठे नक्षल कॅडर ठार झाले होते. त्यानंतर यंदा २१ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात पोलिसांनी १३ नक्षल्यांचा खात्मा केला होता. आजच्या चकमकीतही नक्षवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह आणखी काही मोठे नेते ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही मोठी कारवाई ठरली आहे.

Back to top button