ST workers Strike : कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार? बैठक सकारात्मक झाल्याची माहिती | पुढारी

ST workers Strike : कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार? बैठक सकारात्मक झाल्याची माहिती

मुंबई, पुढारी ऑनलाईन :

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचारी शिष्टमंडळात आज घेण्यात आलेली बैठक सकारात्मक (Strike Meeting) झाल्याचे दिसून आले. यामध्ये सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर सहमती झाल्याची माहिती समजते. त्यामुळे एसटी कर्मचार्ऱ्यांसाेबत झालेल्या बैठकीतील (ST workers Strike) चर्चेनुसार हा एसटीचा हा संप लवकरच मिटेल अशी आशा निर्माण झालीय.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केलाय. शिवाय अनेक कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावरही ठाण मांडून बसलेत. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे करत आहेत.

दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही मैदानात उतरले आहेत. एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारीही उपस्थित होते.

या घडामोडीनंतर कामावर परत या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा देत राज्यातील अनेक संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले. हा संप आणखी चिघळू नये यासाठी सरकारकडून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभुमीवर आज शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब, कर्मचारी संघटनांचे शिष्टमंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांची सह्याद्रीवर बैठक पार झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच या सर्व घडामोडी पहाता हा संप लवकरच मिटेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.

कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर एसटीच्या विलिनीकरणाची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही मात्र आयोगाने विलिनीकरणाची शिफारस केल्यास त्याचा सकारात्मक विचार करू.

– परिवहन मंत्री अनिल परब

हे ही वाचा :

Back to top button