

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणवरून राज्यात आंदोलन सुरू आहे. दरम्यान काल यवतमाळपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रम निमित्ताने फलकांना काळे फासण्याचे आंदोलन झाले. मंगळवारी (दि.३१) सकाळपासून उपराजधानी नागपुरात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, यासाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नागपुरात महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजाचे पदाधिकारी प्रकाश खंडागे यांनी सांगितले की, आमचे आंदोलन साखळी उपोषण स्वरूपात राहणार असून, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला होता. त्यामुळे आता वेळ देऊनही सरकार काही करणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा यावेळी अमोल माने यांनी दिला. दरम्यान आज (दि.३१) रात्री ८ वाजता तुळशीबाग येथून कँडल मार्च देखील मराठा समाजातर्फे काढला जाणार आहे. हा मार्च महाल, गांधीगेटमार्गे शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार आहे.