

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक दिलीप सोनुने यांना भर दिवसा ९ आक्टोंबर सकाळच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींचा अद्यापही सुगावा लागला नाही. या आारोपीचा शोध घेऊन त्यांचे कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
दिलीप सोनुने हे नित्यनियमा प्रमाणे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पेट्रोल टाकून निर्दयीपणे जिवंत जाळले होते. त्यामुळे तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. ५४ वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना सोमवारी (दि. ११) सकाळी १० ते साडे दहा वाजता घडल्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेबाबत तीन दिवस उलटूनही हल्लेखोरांपर्यंत पोलीस अद्यापही पोहचू शकले नाही.
शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे दिलीप धोंडुजी सोनुने (वय ५४) हे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा परिसरात मोठा मित्र व समाज परिवार आहे. याप्रकरणी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन सोनुने यांच्या हल्लेखोराला त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.