Advantage Vidarbha : नागपुरात खासदार औद्योगिक महोत्‍सव ‘ऍडव्‍हांटेज विदर्भ’चे आयोजन | पुढारी

Advantage Vidarbha : नागपुरात खासदार औद्योगिक महोत्‍सव ‘ऍडव्‍हांटेज विदर्भ’चे आयोजन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: विदर्भातील उद्योगांचा विकास, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्‍हावी, या उद्देशाने असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) ची स्‍थापना करण्‍यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या या संघटनेच्‍यावतीने जानेवारी 2024 मध्‍ये नागपुरात खासदार औद्योग‍िक महोत्‍सव ‘ऍडव्‍हांटेज विदर्भ’चे आयोजन करण्‍यात येणार आहे. या महोत्‍सवात विदर्भातील उद्योजकांचादेखील सहभाग राहील. (Advantage Vidarbha)

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) ही विदर्भातील विविध क्षेत्रांतील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या एकमेव उद्देशाने स्‍थापन करण्‍यात आलेली नोंदणीकृत संघटना असून त्‍या माध्‍यमातून विविध उपक्रम राबवून नागपूरच नव्हे तर विदर्भातील उद्योगांचा विकास साधण्‍यात येणार आहे. त्‍याअनुषंगाने खासदार औद्योगिक महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येणार असून यात विदर्भातील खासदार व आमदारांनाही सहभागी करून घेण्‍यात येणार आहे. बिझनेस कॉन्‍क्‍लेव्‍ह, विविध कार्यशाळा, परिषदा आणि वेंडर डेव्‍हलपमेंट प्रोग्रामचा आदींचा त्‍यात समावेश राहील. विदर्भातील उद्योजकांच्‍या यशोगाथा प्रतिबिंबित करणारे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्‍यात येणार असून संकेतस्‍थळदेखील तयार करण्‍यात येणार आहे. ज्‍यात विदर्भातील उद्योगांची माहिती राहील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या पहिल्‍या बैठकीत दिली. या बैठकीला विदर्भातील विविध उद्योगांच्या विविध ३८ क्षेत्रांतील संयोजक मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित होते. (Advantage Vidarbha)

Advantage Vidarbha : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) ची कार्यकारिणी

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) च्‍या अध्‍यक्षपदी आशिष काळे, उपाध्‍यक्ष प्रणव शर्मा व गिरीधारी मंत्री यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सचिव डॉ. विजय शर्मा, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी हे राहणार असून राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ. महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्‍वरी, प्रशांत उगेमुगे व रवींद्र बोरटकर हे या संघटनेचे सदस्‍य आहेत.

विदर्भातील उद्योगांच्‍या विकासात मदत करणे, त्‍यांचा विस्‍तार व्‍हावा व त्‍यांच्‍यात वैविध्‍य यावे यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे, उद्योगांसमोरील आव्‍हाने ओळखून त्‍यांचे निराकरण करणे व त्‍यांचा शाश्‍वत विकास साधणे तसेच, सरकार व उद्योग यांच्‍यातील दुवा म्‍हणून काम करणे आणि त्‍या माध्‍यमातून औद्योगिक समूहाला फायदेशीर धोरण तयार करण्‍यासाठी मदत करणे, हे एडचे प्रमुख लक्ष्य राहणार आहे.

नितीन गडकरी यांनी यावेळी उद्योगाच्‍या विविध क्षेत्रातून आलेल्‍या संयोजकांशी संवाद साधला. व एडच्‍या स्‍थापनेसंदर्भातील भूमिका विशद केली. 27 ऑक्‍टोबर रोजी दुसरी बैठक होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button