भंडारा जिल्ह्याला पुराचा वेढा; वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली | पुढारी

भंडारा जिल्ह्याला पुराचा वेढा; वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

भंडारा ; पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्हा तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने भंडारा जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून टप्प्याटप्प्याने १६ हजार ते १८ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणाखालील भागातही पुराची स्थिती उद्भवली आहे. पवनी तालुक्यातील कोदूर्ली, रेवनी, धानोरी पुलावर पाणी आल्यामुळे कोदूर्ली ते सावरला मार्ग बंद झाला आहे. भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील एक घर पाण्यात गेल्यामुळे तेथील कुटूंबाला स्थलांतरित करण्यात आले.

भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका घरात पाणी गेल्यामुळे त्यांना स्थलांतरित करण्यात आले. कारधा येथील घरांना पाणी लागल्यामुळे तीन कुटुंब ग्रामपंचायत येथे स्थलांतरित केले आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी गावाचे दोन्ही बाजूनी नाल्यास पाणी आले असून रस्ता ब्लॉक झाले आहेत. लागूनच असलेल्या रेंगेपार गावातील वैनगंगा नदीची पुराच्या पाण्याची पातळी रात्रीपेक्षा ५ फूटानी वाढली आहे. परंतु, गावात पाणी गेले नाही.

सुकळी नकुल गावातील पाण्याची पातळी २ फूटानी वाढली आहे. मध्यप्रदेशला जोडणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय वाहतूक पुलावरून पाणी असून रात्रीपेक्षा जास्त पाण्याची पातळी वाढली आहे.

कारधा पुल (जुना), भंडारा येथे वैनगंगा नदीची इशारा पातळी ही २४५ मीटर व धोका पातळी २४५.५० मीटर आहे. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२. ३० वाजता २४५. ५४ मीटर पाणी पातळीची नोंद घेण्यात आली असुन वैनगंगा नदीने (भंडारा) धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नदीची पाणीपातळी सतत वाढत असल्याने पुरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. सखल भागात नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button