

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : "जालन्यात मराठा समाजावर केलेला लाठीचार्ज हा सरकार आणि गृहविभाग पुरस्कृत आहे. मराठा समाजाचा ठिकाठिकाणी उद्रेक सुरू आहे. केवळ मतासाठी यांची आरक्षणाची बनवाबनवी सुरू होती. ती चूक आता महागात पडेल. आधी पोलिसांवर दगडफेक झाली हे गृह विभाग खोटे बोलत आहे. पोलिस जखमी झाल्याचा आकडा वाढवून सांगितला जात आहे," असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्यापूर्वी आरक्षण मर्यादा वाढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे.
मराठा समाजाला शांततेचे आवाहन करत वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवळपास ४ हजार किमी प्रवास करत जाती- धर्मातील दरी मिटवल्या. दुसरीकडे मागच्या सहा महिन्यात राज्यात सात दंगली झाल्या. याला जबाबदार कोण हे कळेलच. काँग्रेसच्या पदयात्रेतून माणसाला जोडू, लोकांच्या वेदना जाणू. आज सरकारमुळे कोणताच घटक खुश नाही. काँग्रेसला बळकटी या यात्रेने मिळेलच शिवाय माणसाला माणूस म्हणून जोडेल. मी आज जालना येथील घटनेची तिथे जाऊन माहिती घेईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज्यात ओबीसी नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जाते. आता कामठीवाले एक राहिले आहेत. त्यांचा दिवा किती दिवस उजळत राहतो हे पाहतोय, असा अप्रत्यक्ष टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.
हेही वाचा :