भंडारा : पावसाचे पुनरागमन, शेतकरी सुखावला; उर्वरित रोवणीला आला वेग | पुढारी

भंडारा : पावसाचे पुनरागमन, शेतकरी सुखावला; उर्वरित रोवणीला आला वेग

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने रजा घेतली. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा पडणार अशी भीती व्यक्त होत असतानाच दोन दिवसांपासून पावसाने पुनरागमन करुन सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.

यावर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाला खंड पडला. दुबार पेरणीचे संकट ओढावले. मात्र तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पाऊस बरसला. जुलै महिन्यात दमदार पाऊस पडल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. अनेक दिवस पाऊस न आल्याने शेतजमिनीला भेगा पडल्या. पिके करपण्याची  भीती व्यक्त होत होती. अशातच दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे धानपिकाच्या उर्वरित रोवण्यांना वेग आला आहे.

वैनगंगेचे जलस्तर वाढले

मध्यप्रदेशातील संजय सरोवर परिसरात सातत्याने पाऊस पडत असल्याने सरोवराची पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी १९ ऑगस्टच्या संध्याकाळपासून जलद्वार उघडण्यात आले. त्यातून २० हजार घनफुट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होणार आहे. संजय सरोवराचे पाणी भंडारा येथे पोहोचण्यासाठी सुमारे ३९ तासांचा कालावधी लागतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे संजय सरोवराचे पाणी येण्यासाठी वैनगंगेचे पात्र तयार ठेवण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास गोसे धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे उघडण्यात येऊन ४५३९.९७ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

घरात पाणी शिरले

पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील सरांडी बूज गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने घरातील जीवनापयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घरात जवळपास एक ते दीड फुट पाणी जमा झाले.त्यामुळे घरात ठेवलेले गहू,तांदूळ यासह अनेक साहित्याची मोठे नुकसान झाले. सरांडी येथील नंदा विठ्ठल भरणे, हेमलता हेमराज मिसार, भूपेश गजानन बुराडे, मनीषा बाळू बुराडे, तुलाराम बुरादे, हिरामण दोनाडकर, प्रतिभा ईश्वर कुथे यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तालुका प्रशासनाने तात्काळ नोंद घेऊन मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Back to top button