चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | पुढारी

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा आपल्या शेतात निंदन करायला गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्‍ल्‍यात महिला ठार झाली. ही घटना भद्रावती तालुक्यातील टेकाडी (दी.) शेतशिवारात काल (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (वय ६०) रा. टेकाडी (दी.) असे मृत महिलेचे नाव आहे. काल लक्ष्मीबाई आपल्या शेतात सुनेसोबत निंदनाचे काम करण्यासाठी गेली होती. दिवसभर शेतात काम करीत असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने शेतात त्‍यांच्यावर हल्ला केला. त्यात गंभीर जखमी होवून त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

लगतच्या शेतातील लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने लक्ष्मीबाई यांना सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पुढील कार्यवाही केली.

हेही वाचा : 

Back to top button