नागपूर: पुढारी वृत्तसेवा : देशाच्या अर्थव्यवस्थेत 1 ट्रीलियन डॉलरचे योगदान देण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणारी अर्थव्यवस्था उभारली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १५) येथे दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी दिलेले 'पंचप्रण' प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अनुरुप कर्तव्य बजावावे, असे आवाहनही त्यांनी (Devendra Fadnavis) यावेळी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आज स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
फडणवीस म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने 50 हजार रुपये दिले आहेत. 'पीएम किसान' योजनेला पूरक अशी 'नमो शेतकरी सन्मान योजना' राज्य शासनाने आणली असून केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनेही प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मागणीनुसार मागेल त्याला शेततळे, ड्रीप, पेरणी यंत्र देण्यात येत आहेत. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने पश्चिम विदर्भात पहिल्या टप्प्यात 4 हजार कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात 6 हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत. या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया, शेतमालाची साठवणूक, शेतमालास भाव मिळवून देण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल. राज्यात 1 रुपयांमध्ये पंतप्रधान पीक विमा नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दीड कोटी इतकी विक्रमी झाली आहे. नागपूर जिल्हयातही प्रथमच अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यांतर्गत नोंदणी केली आहे.
नागपुरचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने जोमाने कामे होत आहेत. 227 कोटी रुपयांच्या खर्चातून शहरात 'ॲग्री कन्व्हेंशन सेंटर' उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व नागपूरचा विकास साधला जात आहे. नागपूर शहरात जवळपास 1 हजार एकरावर अत्याधुनिक सुविधा युक्त 'लॉजिस्टीक पार्क' उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शहराची आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कार्य सुरु आहे. याअंतर्गत 76 वर्ष जुन्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे उन्नतीकरण करण्यासाठी 525 कोटींचा निधी देण्यात आला आहे. यातील 172 कोटींच्या कामांचे भूमीपूजन पार पडले असून लवकरच 142 कोटींच्या कामांचीही सुरुवात होणार आहे. मेयो रुग्णालयातील सेवा अधिक बळकट करण्यासाठी 350 कोटींच्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिकलसेलच्या उच्चाटनासाठी पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीतून महत्वाचा कार्यक्रम देशभर राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 लाख रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नळगंगा आणि वैनगंगा प्रकल्प सद्या मंजुरीच्या शेवटच्या टप्पात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील दुष्काळी भागासह सर्व जिल्हे जलयुक्त करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्टील उद्योगाद्वारे 20 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. येत्या काळातही याच उद्योगात 1 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सकारात्मक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा