विकासाच्या नावावर जिंकणार तर, भाजपला इतरांच्या कुबड्या कशाला : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विकासाच्या नावावर जिंकू शकत नसल्यानेच भाजपला २६ पक्षाच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. विरोधकांना शिव्याशाप द्याव्या लागत आहेत. काँग्रेस फुटणार नाही, काही लोक इकडून तिकडे गेले तरी काँग्रेसचे चिन्ह पंजा कुठे जाणार नाही. असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केले. बुधवारी (दि.९) वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कधीकाळी भ्रष्ट असलेलेच मांडीला मांडी लावून बसले आहेत. लवकरच पुराव्यानिशी अनेक भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.
वडेट्टीवार म्हणाले, आज सत्तेचे केंद्र विदर्भ होत आहे. त्यामुळे भविष्यात सत्ता आली, तर हायकमांडने विदर्भातून मुख्यमंत्री पद द्यावे अशी आपली मागणी राहील. मात्र, मी होणार की नाही हे हायकमांड ठरवेल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक जिंकण्याची आमची जबाबदारी आहे. कुठलाही तिढा निर्माण होणार नाही. वीज संकट गंभीर आहे. राज्यातील जनतेला वीज दरवाढीमुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. साडेसात लक्ष टन कोळसा ज्यांना वॉशरीसाठी दिला होता, तो कमी दरात मार्केटमध्ये विकला. त्यांच्यावर पुढे वाढीव दंड ठोठावला असून पुराव्यानिशी लवकरच सारे उघड केले जाईल. त्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या पाहिजेत. याशिवाय धान खरेदी हा मोठा घोटाळा आहे. आज तीन पक्षांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
दरम्यान, आपल्या विरोधात ३० आमदारांनी सह्यांचे पत्र हायकमांडकडे दिले होते. तो एक प्रयोग होता. मात्र, त्यावर जागीच पडदा पडला. लोकशाहीत सर्वांना महत्वाकांक्षा असते शेवटी हायकमांड महत्वाचे असते. विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीतून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत जाणार का, याकडे लक्ष वेधले असता माझा पायगुण चांगला आहे. गेल्यावेळी आम्ही कमी संख्याबळ असल्याने विरोधी बाकांवर बसण्याचे ठरवले मात्र आमचे तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले, आताही मी सांगतो आमचे मविआचेच सरकार येणार, विदर्भातील किमान ४५ आमदार आमचेच असणार असेही वडेट्टीवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी अविवाहित राहील पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. परंतु त्यांनी शब्द पाळला नाही त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. पण मी कायम काँग्रेसमध्येच राहीन. आमदार बच्चू कडू यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना सत्य कळले आहे. त्यामुळे भविष्यात ते या सरकारला खाली खेचत महाविकास आघाडीसोबत येतील, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचलंत का ?
- Congress : काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पदयात्रेची दोन नेत्यांवर जबाबदारी; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- Rahul Gandhi : अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींच्या भाषणातील ठळक ५ मुद्दे
- भ्रष्टाचार-घराणेशाही-तुष्टीकरण ‘चले जाव’ : अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबाेल