राज्यातील सहा विभागात ही पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. ही पदयात्रा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात फिरेल. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे समनवयक असतील. अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रेच्या माध्यमातून अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्हे पिंजून काढतील. याचप्रमाणे मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र विभागात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबईत माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा झाल्यानंतर लगेच बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजप सरकारने जनतेला खोटी आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली यादृष्टीने विविध सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत.