चंद्रपूर : मद्यधुंद युवकांकडून बारमालकास मारहाण; बारची तोडफोड, चौघांना अटक | पुढारी

चंद्रपूर : मद्यधुंद युवकांकडून बारमालकास मारहाण; बारची तोडफोड, चौघांना अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्‍तसेवा चिमूर येथील वरोरा मार्गावरील ग्रीनलँड बारमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मद्यधुंद युवकांनी नशेत तर्र होत बार मालकास मारहाण केली. यावेळी या युवकांनी बारमध्ये तोडफोडही केली ही घटना (सोमवार) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार युवकांना अटक केली आहे. या घटनेतील चार युवक पसार झाले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. गोलू उर्फ रोहित श्रीरामे, नयन तळवेकर, उमेश तळवेकर, अनिकेत पोइनकर (रा. चिमूर) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार चिमूर-वरोरा मार्गावरील ग्रीनलँड बारमध्ये सोमवारी रात्री दहा वाजेण्याच्या सुमारास आठ युवक वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. एकाच टेबलवर बसून सर्वजण मद्यप्राशन करीत होते. दरम्यान, बार बंद करण्याची वेळ होत आली तरी त्यांचे मद्यप्राशन करणे सुरूच होते. त्यामुळे बार मालक राकेश नंदुरकर यांनी वेटरव्दारे त्यांना आटोपता घेण्याची सूचना केली. यावेळी त्‍या युवकांनी बार मालकाला शिवीगाळ सुरू केली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्‍या युवकांनी बार मालकाला मारहाण केली. त्यानंतर बारमधील टेबल, खुर्च्या व दारूच्या बाटल्या व ग्लास तोडफोड केली. यामध्ये मोठ्याप्रमाणात बारमालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटना सूरु असताना मालकाने ११२ टोल फ्री क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत काही युवक पसार झाले होते, तर घटनास्थळी असलेले युवक गोलू उर्फ रोहित श्रीरामे, नयन तळवेकर, उमेश तळवेकर, अनिकेत पोइनकर (रा. चिमूर) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर पसार झलेल्या युवकांचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात सूरु आहे.

ग्रीनलँड बारमध्ये घडलेल्या घटनेचा चिमूर लिकर बार असोसिएशनने बार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. बारमध्ये धिंगाणा घालणाऱ्या युवकांना अटक करण्याची मागणी लिकर बार असोसिएशन अध्यक्ष मनीष नंदेश्वर, उपाध्यक्ष उमेश कुंभारे, सचिव धरमसिंह वर्मा, कोषाध्यक्ष भीमराव ठावरी, सदस्य श्रीनिवास निवटे, पद्माकर बनकर, प्रमोद भटगरे, मनमित कुंभारे, राकेश नंदुरकर, संगीता मराठे आदींनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button