NCP Crisis : नागपूर शहर राष्ट्रवादीचा ठराव; ‘आम्ही पवार साहेबांसोबतच’

NCP Crisis : नागपूर शहर राष्ट्रवादीचा ठराव; ‘आम्ही पवार साहेबांसोबतच’
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री म्हणून भाजप-सेनेच्या सत्तेत सहभागी होत बंड (NCP Crisis) पुकारले. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षात गोंधळाची स्थिती आहे. अनेकजण आपल्या भविष्याची चिंता करीत संभ्रमात आहेत. सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मविआचे चांगले दिवस आलेले दिसत असताना अडचणीत सापडले. उपराजधानी नागपुरातही असाच काहीसा संभ्रम कायम आहे. ५ जुलैला मुंबईत दोन्ही बाजूने बैठक आयोजित करण्यात आली असल्याने नेमके कोण कुणाच्या मागे हे उघड होणार आहे.

अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची यापूर्वीच हकालपट्टी  (NCP Crisis) करण्यात आली. राजू राऊत यांना जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी दिली गेली. त्यानंतर शहर राष्ट्रवादीमध्ये गोंधळ कायम होता. माजी अध्यक्ष अनिल अहिरकर, आभा पांडे अजितदादांसोबत असल्याचे दिसत असताना शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे नॉट रिचेबल होते. अखेर आज मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या बैठकीनंतर शहर राष्ट्रवादी शरद पवारांसोबत तर ग्रामीण राष्ट्रवादी अजित पवारांसोबत असे काहीसे चित्र नागपूरचे दिसत आहे. पण बाबा गुजर यांच्यासोबत खरेच किती कार्यकर्ते उद्या बुधवारच्या मुंबई येथील बैठकीला जातील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणावर पकड असलेले नेते माजी मंत्री अनिल देशमुख आणि रमेश बंग हे आज तरी शरद पवारांसोबतच आहेत. अशा स्थितीत बाबा गुजर यांच्यासोबत कोण जाणार ? हे लवकरच उघड होणार आहे.

NCP Crisis : प्रफुल्ल पटेल आणि बाबा गुजर यांचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी फाडले.

दरम्यान, आज शहर कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शरद पवार समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले. शरद पवारांसोबत गद्दारी करणारे खासदार प्रफुल्ल पटेल आणि बाबा गुजर यांचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी फाडले. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात काही काळ घोषणाबाजीही करण्यात आली. आम्ही माजी मंत्री, आमदार अनिल देशमुख, रमेश बंग यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम करणार असल्याचे राष्‍ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी आज शहर कार्यकारिणीची बैठक घेतली. यामध्ये प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांच्यासह प्रदेशचे पाच पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय सर्व आघाड्या आणि सेलचे अध्यक्षही उपस्थित होते. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आपली निष्ठा व्यक्त करीत त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news