Maharashtra Politics: ‘…आता अर्धी-अर्धी भाकरी खावी लागणार’; अजित पवारांमुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी | पुढारी

Maharashtra Politics: '...आता अर्धी-अर्धी भाकरी खावी लागणार'; अजित पवारांमुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. त्याला सामोरे गेले पाहिजे. जिथे एक भाकरी खायची होती तिथे आता अर्धी-अर्धी अन् ज्याला अर्धी भाकरी खायची होती त्याला पाव भाकरी खावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकात थोडीफार नाराजी असणारच आहे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Maharashtra Politics) यांनी केले आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आज (दि.०४) माध्यमांशी ते बोलत होते.

अजित पवार यांनी 35-40 आमदारांसोबत राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी करत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या सत्तेतील सहभागाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळाला आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी ‘आता अर्धी अर्धी भाकरी खावी लागणार’ अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याने अजित पवार यांच्या सत्ताप्रवेशावर शिंदेंची शिवसेना (Maharashtra Politics)  नाराज असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

Maharashtra Politics न्याय हा द्यावाच लागेल, आम्ही आशावादी-संजय शिरसाट

बहुमत असताना नव्या गटाला का घेतलं? सगळंच सोडायचे असेल, तर सत्ता कशाला हवी? आता सर्वांनाच तडजोड करावी लागेल, असे म्हणत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी देखील अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या नाराजीची ‘री’ ओढली आहे. पुढे ते म्हणाले न्याय हा द्यावाच लागेल, याबाबत आम्ही आशावादी आहोत. अशी भूमिका संजय शिरसाट यांनी घेतली आहे.

हेही वाचा:

Back to top button