

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी शिंदे म्हणाले, दुर्देवाने झपकी लागते अशा प्रकारचे अपघात होतात, नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होतात. समृद्धीवर सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, असे अपघात होऊन चालणार नाही. कारण प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्यत्रदर्शींनी सांगितले की, पोलिस, अग्निशमन गाडी, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली. पण दरवाजा बंद असल्यामुळे ट्रॅव्हल मधील लोकांना बाहेर येता आले नाही. जे काही काळजी घेता येईल, ती काळजी घेतली जाईल. प्रत्येकाने गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे. हा अपघात अतिशय भयावह आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.