नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी विश्वचषक स्पर्धेतील पुणे, मुंबईत प्रत्येकी ५ सामने होत असताना त्याच तोडीचे स्टेडियम व सर्व सुविधा असताना नागपुरातील व्हीसीए स्टेडियममध्ये एकही सामना का नाही, हा विदर्भावर अन्याय असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. यासंदर्भात फेरविचार करावा, असे बीसीसीआयला पत्र लिहिणार असल्याचेही देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना नागपुरात नाही. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर विदर्भासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथून प्रेक्षक सामना बघण्यासाठी येतात. विश्वचषक सामन्यात पुण्यातील स्टेडियममध्ये पाच सामने खेळवले जात असताना विदर्भातील स्टेडियममध्ये एकही सामना नाही. हा एक प्रकारे विदर्भावर अन्याय आहे. त्यामुळे विदर्भात विश्वचषक स्पर्धेतील एकतरी सामना खेळवला जावा. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना स्थळांमधून नागपूरला वगळण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. नागपूरकर प्रेक्षक पहिल्यांदाच वर्ल्डकपचा सामना घरच्या मैदानावर पाहू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, धर्मशाळा आणि लखनौ या १० शहरांमध्ये सामने खेळले जाणार आहेत. मात्र देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरचा कुठेही उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचलंत का ?