नागपूर: पुढारी वृत्तसेवा: बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून दुबार, तिबार पेरणीचा धोका ओढवून घेऊ नये. सध्या विदर्भात उष्णतेची लाट आहे. मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी जास्त आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पाऊस होतो. मात्र, बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मान्सूनवर (Monsoon) परिणाम झाला आहे. मान्सून लांबल्याने खरीप पेरणीचे नियोजन बिघडले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, कृषी तज्ञ्ज डॉ. शरद निंबाळकर 'पुढारी'शी बोलताना म्हणाले की, पूर्वी 8 जून पर्यंत पाऊस (Monsoon) आपल्याकडे येत होता. गेल्या अनेक वर्षात तो 15 जूनच्या पुढे येत आहे. यावर्षी तर चक्रीवादळामुळे तो अधिकच पुढे गेला आहे. मात्र, किमान 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पूर्वापार परंपरेप्रमाणे ओल्या जमिनीतला मातीचा चेंडू करून वर फेकायचा आणि खाली पडताना तो फुटला नाही. तर पेरणी करायची हा सोपा मंत्र त्यांनी कटाक्षाने पाळण्याचा सल्ला दिला.
यंदा, मात्र दीर्घकालीन पिके टाळावीत, कापूस, धान, सोयाबीन, तूर, ज्वारी या सर्वच पिकांची पेरणी करताना 20 टक्के बियाणे अधिक वापरावे, दीर्घकालीन नव्हे तर कमी कालावधीत येणारी बियाणे वापरावी, दोन ओळी मधले अंतर कमी करावे, सहा ओळी कापूस एक ज्वारी दोन ओळी तूर एक ओळ कापूस आणि पुन्हा सहा ओळी कापूस अशा पद्धतीने आंतरपिके घ्यावीत. जेणेकरून एका पिकाचे होणारे नुकसान शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकातून भरून निघू शकेल. आधीच संकटात असलेल्या शेतीचे अर्थकारण शाबूत राहील, असा सल्ला डॉ. निंबाळकर यांनी दिला.
पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगाम रखडला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात 8.8 टक्के पाऊस पडला आहे. 100 मिलिमीटर तीन ते चार दिवस पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका, असे वारंवार कृषी विभागामार्फत सांगितले जात आहे. कापूस उत्पादक यवतमाळ परिसरात धूळपेरण्या सुरू आहेत. गतवर्षी देखील याच पद्धतीने पावसाने दगा दिला. सुमारे 15 हजारावर हेक्टरमध्ये धूळपेरणी उलटल्याची स्थिती बघायला मिळाली. यंदा विदर्भात मान्सूनला अधिकच उशीर झालेला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात 19.25 लाख हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून आतापर्यंत 0.03 इतकी पेरणी झाली आहे. तर अमरावती विभागात 32. 59 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असून 0.0 2 टक्के पेरणी झाली. यातही धुळपेरणी अधिक आहे. स्कायमेट आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार सहा जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस विदर्भात पडेल. मात्र, हा अंदाज देखील चुकल्यास दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा