यवतमाळ: शेतरस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून | पुढारी

यवतमाळ: शेतरस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद करीत सात जणांनी संगनमत करून कुऱ्हाडीने घाव घालत ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून केला. ही घटना रविवारी मध्यरात्री यवतमाळ तालुक्यातील वडगाव येथे घडली. या घटनेतील सात आरोपींना पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे.

पांडुरंग रामजी चव्हाण (वय ६०, रा. वडगाव) असे मृताचे नाव आहे. पांडुरंग व आरोपी यांच्या शेतातील रस्त्याचा तहसीलमध्ये वाद सुरू होता. तहसीलदारांच्या मध्यस्थीने पांडुरंग यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळाला होता. रविवारी पांडुरंग या रस्त्याने जात असताना विशाल विठ्ठल राठोड, सोनू डोमा राठोड, इंदल उत्तम राठोड, राहुल संतोष जाधव, प्रकाश नरसिंग राठोड, खुशाल भीमराव राठोड, कैलास नरसिंग राठोड या ७ जणांनी त्यांना जबर मारहाण केली.

पांडुरंग यांच्या डोक्यावर, मानेवर कुऱ्हाडीने घाव घातले. यावेळी पांडुरंग ओरडत असताना शेतशेजारी असलेला नागोराव रामचंद्र तीवसकर (वय ६४, रा. आमला) याने घटनास्थळी धाव घेतली. त्यालाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पांडुरंगला तातडीने दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान पांडुरंग यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून या घटनेतील सातही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर, रवींद्र जगताप, ब्रम्हदेव टाले करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button