Anil Deshmukh: चुकीचे धोरण, आयातीमुळेच कापसाचे भाव पडले : अनिल देशमुख | पुढारी

Anil Deshmukh: चुकीचे धोरण, आयातीमुळेच कापसाचे भाव पडले : अनिल देशमुख

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने राज्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला. मात्र, अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले. देशातील कापड उद्योगाला फायदा मिळण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली येऊन मोठ्या प्रमाणात विदेशातून कापसाची आयात करण्यात येत असल्याने देशांतर्गत कापसाचे भाव पडल्याचा आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत केला.

देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले की, 2021 -22 च्या हंगामात जवळपास 39.36 लाख हेक्टर मध्ये कापसाचा पेरा होता. खुल्या बाजारात कापसाला साडेबारा हजार रुपये भाव मिळाला. चांगला भाव मिळाल्यामुळे 2022-23 च्या हंगामात राज्यात 7 टक्के कापसाचा पेरा वाढून तो 42.11 लाख हेक्टर पर्यंत झाला. यावर्षी सुद्धा मागच्या वर्षी सारखाच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, मोठ्या प्रमाणात कापसाची आयात केंद्र सरकारने केल्यामुळे देशांतर्गत कापसाचे भाव पडले.

सप्टेंबर- ऑक्टोंबर 2022 च्या काळात कापसावरील आयातीवर असलेले 11 टक्के शुल्क माफ करण्यात आले. कापड उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी विदेशातून आयात केल्या. शुल्क माफ करताच 12 लाख गाठींची आयात करण्यात आली. अलीकडेच 15 दिवसांपूर्वी 4 लाख गाठींची विदेशातून आयात करण्यात आली. गतवर्षी 43 लाख गाठी निर्यात झाल्या असताना यावर्षी केवळ लाख 30 लाख गाठी निर्यात करण्यात आल्या. एकंदरीत गतवर्षीच्या तुलनेत 13 लाख गाठींची निर्यात कमी झाली. त्यामुळे देशांतर्गत कापसाचे भाव पडले सध्या बाजारात कापसाला साडेसहा ते 6800 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. यातून कापूस उत्पादकांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही.

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला नाही. बऱ्याच दिवसापासून तो घरात असल्याने कापसाची प्रत घसरली. वाढत्या तापमानामुळे कापसाच्या वजनात घट झाली. दुसरीकडे कापसात पडलेल्या किड्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्वचारोगास सामोरे जावे लागत आहे. या एकंदर परिस्थितीत राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत असताना आयात निर्यात धोरणाबाबत फेरविचार करावा, हवालदिल शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी अनिल देशमुख यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button