चंद्रपूर : माझी व आरोपींची नार्कोटेस्ट करा; काँग्रेस नेते संतोषसिंग रावत यांची मागणी | पुढारी

चंद्रपूर : माझी व आरोपींची नार्कोटेस्ट करा; काँग्रेस नेते संतोषसिंग रावत यांची मागणी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिलेली कबुली ही पूर्णत: खोटी आहे. मी त्या आरोपींना कधी भेटलो नाही. कधी पाहिले नाही. त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. या घटनेतील मुख्य सुत्रधारावरील पोलिसांचे लक्ष विचलीत करण्याकरीता आरोपींनी खोटी कबूली दिली आहे. त्यामुळे माझी व आरोपींची नार्कोटेस्ट करा, सत्य बाहेर येईल, अशी मागणी काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी पोलीस अधिक्षक रविंद्र सिंग परदेशी यांना केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत आहे. राजकीय दिशेनेही तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकांनी सांगितले आहे. मात्र, रावत यांचा थेट राजकीय व्यक्तीकडे इशारा असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

११ मे ला मुल येथे काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसींग रावत हे रात्री साडेनऊच्या सुमारास बँक शाखेमधून दुचाकीने घरी जात असताना अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. सुदैवाने गोळी हाताला चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. मुल पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल अकरा दिवस आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर माजी मंत्री तथा आमदार विजय वड्डेटीवार आरोपी शोधून काढण्याकरीता जिल्हाभर आंदोलन करण्याचा अल्टीमेटम दिला. तर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी, या प्रकरणातील आरोपींना तातडीने शोधून कोढण्याचे निर्देश पोलिस अधक्षिकांना दिल्यानंतर बाराव्या दिवशी चंद्रपूरातील दोघे सख्ये भाऊ राजवीर कुंवरलाल यादव (वय ३६) ,अमर कुंवरलाल यादव (वय 29) अटक करण्यात आली. त्यांची विस्तृत चौकशी केली असता, त्यांनी वकोलीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी रावत यांनी पैसे घेतले. नोकरी लावून दिली नाही आणि पैसे वापस केले नाही. त्यामुळेच ११ मे ला रात्री रावत यांचेवर गोळीबार केल्याची कबुली दिली. पोलिस अधिक्षकांनी आरोपीनी दिलेली माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.

मात्र, या प्रकरणातील फिर्यादी काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी आरोपींनी दिलेली कबुली पूर्णत: खोटी असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना मी कधीच पाहिले नाही. त्यांची कधी भेट झाली नाही. त्यांचा माझा कधीच संबंध आला नाही. त्यांना मी दूरदूरपर्यंत ओळखत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी सहकार क्षेत्रात आणि राजकारणात सक्रीय आहे. वेकोलीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे मी वेकोलीत नोकरी लावून देण्याकरीता पैसे घेतल्याचा आरोप हास्यास्पद आहे. या प्रकरणात खऱ्या आरोपींपर्यंत पोलिसांना जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आहे. माझी प्रतिमा खराब करणे व मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण देवून खऱ्या आरोपी पर्यंत पोलिसांना पोहचू न देण्याकरीता हा प्रकार असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. पोलिस करीत असलेल्या चौकशीचे समाधान असल्याचे सांगून आरोपींनी लावलेल्या आरोपाची सत्यता पडताळण्याकरीता माझी व आरोपींची नार्कोटेस्ट करावी. जेणे करून या प्रकरणाची सत्यता पुढे येण्याकरीता गोळीबार प्रकरणातील मास्टर माईंड शोधून काढण्याची पोलिस अधिक्षकांना विनंती मागणी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button