गडचिरोली : जहाल नक्षलवादी मंगरु मडावी यास पेरमिलीच्या जंगलातून अटक - पुढारी

गडचिरोली : जहाल नक्षलवादी मंगरु मडावी यास पेरमिलीच्या जंगलातून अटक

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा

विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला नक्षल्यांच्या पेरमिली दलमचा सदस्य मंगरु कटकू मडावी यास पोलिसांनी पेरमिली परिसरातून अटक केली आहे.

विशेष अभियान पथकाचे जवान आज मध्यरात्री पेरमिली परिसरात गस्तीवर असताना मंगरुला ताब्यात घेण्यात आले. मंगरु मडावी हा भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथील मूळ रहिवासी आहे. तो नक्षल्यांच्या पेरमिली दलमचा तसेच अॅक्शन टीमचा सदस्य होता. शिवाय दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचाही तो वरिष्ठ कॅडर होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

यंदाच्या उन्हाळ्यात एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरंपच रामा तलांडी यांचा खून, बुर्गी पोलिस ठाण्यावर हल्ला तसेच अन्य् घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर खुनाचे ३ आणि चकमकीचा १ असे ४ गुन्हे दाखल होते. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. दरम्यान, नक्षलवादयांनी हिंसेची वाट सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन अंकित गोयल यांनी केले आहे.

Back to top button