लालपरीत किर्रर्र अंधार, मोबाईलच्या प्रकाशात काढले तिकीटे; एसटी बसेसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह | पुढारी

लालपरीत किर्रर्र अंधार, मोबाईलच्या प्रकाशात काढले तिकीटे; एसटी बसेसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’अशी राज्य सरकारची विविध योजनांची माहिती राज्याच्या चांदा ते बांदापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या लालपरीची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचा प्रकार बुधवारच्या रात्री प्रवाशांनी अनुभवला. बसमधील लाईट पूर्णपणे बंद झाल्याने वाहकाला प्रवाशांच्याच मोबाईलच्या प्रकाशात तिकीटे काढावे लागले. अंधार असल्याने अनेक वृद्ध प्रवासी जागीच थबकून बसले होते. गोंदिया ते तुमसर या मार्गावर हा प्रसंग घडला.

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकार स्थापन झाल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका सुरू करण्यात आला. राज्य सरकारच्या विविध योजना शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी विविध यंत्रणांचा वापर करण्यात आला. त्यातीलच एक म्हणजे एसटी बसेसवर ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशी जाहिरात करुन योजनांची माहिती पोहचविली जात आहे. अलीकडेच एसटी बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याने महिलांमध्ये एसटीचा प्रवास आवडीचा झाला आहे. परंतु, ज्या एसटीच्या भरवशावर शासकीय योजनांची जाहिरात केली जाते त्या एसटीची स्थिती जाणण्याचा प्रयत्न मात्र सरकारदरबारी केला जात नसल्याचा अनुभव खुद्द प्रवाशांनी बुधवारी घेतला.

बुधवारी संध्याकाळी गोंदिया आगारातून तुमसरला जाण्यासाठी शेवटच्या एसटी बसमध्ये प्रवासी बसले. ही बस साधारण असल्याने प्रत्येक थांब्यावर प्रवासी बसत होते. अंधार झाल्याने एसटीतील लाईट सुरू करण्याची वेळ झाली तरी चालकाने लाईट सुरू केले नाही. याबाबत वाहकाला विचारले असता लाईट बंद असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे एसटीत पूर्णपणे अंधार पसरला होता. अशा स्थितीत वाहक प्रत्येक बाकाजवळ जाऊन तिकीट काढत होता. त्या अंधारात त्यालाही काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तो प्रवाशांना त्यांच्या मोबाईलचा प्रकाश सुरू करण्याची विनंती करीत होता. प्रवाशाने मोबाईलचा प्रकाश सुरू केल्यानंतर वाहक तिकीट आणि पैसे देत होता. त्यानंतर पुढच्या बाकावर गेल्यावर पुन्हा प्रवासी मोबाईल काढून वाहकाला प्रकाश पुरवित होते. हा संपूर्ण प्रकार बसमधील सर्वच आबालवृद्धांनी पाहून एसटीबाबत सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.

या प्रवासादरम्यान काही वृद्ध प्रवासी बसमध्ये चढले. परंतु, पुढे जाण्यासाठी त्यांना काहीच दिसत नसल्याने ते जागीच थांबून होते. संध्याकाळी ६.३० वाजता गोंदियावरुन निघालेली ही बस तुमसरला रात्री ९ च्या सुमारास पोहोचली.

६.३० नंतर उपराजधानीसाठी नाही बस

राज्याच्या शेवटच्या टोकावर गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया एसटी आगारातून राज्याची उपराजधानी नागपूरला जाण्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजतानंतर एकही बस नाही. हे अंतर साधारण १५० किमी आहे. त्यामुळे आपातकालीन स्थितीत कुणाला संध्याकाळनंतर नागपूरला जायचे असेल तर त्याला अधिकचे पैसे मोजून खासगी वाहनांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुमसर आगारातून रात्री ८ नंतर जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारासाठी बस नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश आगारात हीच स्थिती आहे. ही स्‍थिती कधी बदलणार असा सवाल प्रवाश्यांनी केला आहे.

-हेही वाचा 

पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

वजन कमी करताय? ‘नॉन-शुगर स्‍वीटनर’ पासून लांब राहा : ‘डब्ल्यूएचओ’चा सल्‍ला

छत्रपती संभाजीनगर- पुणे शिवाई ई-बसला सुरूवात

Back to top button