

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचेवर गोळी झाडून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचा तत्काळ शोध लागला नाही. तर जिल्हाभर आंदोलन उभारु असा इशारा माजी मंत्री तथा आमदार विजय वडे्टीवार यांनी शनिवारी (दि.१३) संतोष रावत यांच्या घरी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
११ मे रोजी रात्रो पाऊने दहाचे सुमारास मुलीतील बँकेच्या उपशाखेतून संतोष रावते घरी जात असताना चार चाकी वाहनाने येऊन बुरखाधारी आरोपीने त्यांचेवर बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु बंदुकीची गोळी हाताला चाटून गेल्याने ते सुदैवाने बचावले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करण्यात आला, परंतु त्यांचा सुगावा लागला नाही. शनिवारी भ्याड हल्ल्याचे पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुल येथे संतोष रावत यांच्या निवासस्थानी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर रावत यांचे घरी पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील आरोपी व मास्टर माईंड यांचा तत्काळ शोध घ्यावा असा इशारा दिला.
चंद्रपूर जिल्हयाच्या इतिहासात राजकिय नेत्यावर बंदुकीतून गोळी झाडून हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संतोषसिंह रावत यांचे जिल्हयात कोणाशीही वैयक्तिक वैरत्व नाही, असे असतांना त्यांचेवर पाळत ठेवून गोळी झाडल्या जाणे ही घटना विकृत मानसिकतेचे द्योतक असल्याचे आ. वडेट्टीवार म्हणाले.
संतोष रावत यांचेवर भ्याड हल्ला होवून तीन दिवस झाले, परंतू अद्याप पर्यंत हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही, त्यामूळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होवू नये म्हणून पोलीस विभागाने सदर प्रकरणाचा तपास करतांना जात, धर्म, पक्ष आणि पद याची तमा न बाळगता आरोपींना पडदयासमोर आणावे, अन्यथा सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने जिल्हाभर निषेध सभा, रास्ता रोको करून जिल्हा बंद पाडू असा इशारा दिला.
आंदोलन सूरु झाल्यानंतर पहिली निषेध सभा स्थानिक गांधी चौकात घेण्यात येईल, असे सांगून नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीवरुन जिल्हयात काॅंग्रेस मजबुत होत असल्याचे दिसून येते. परंतु, काही मंडळींना काॅंग्रेसची मजबुती खपत नसल्याने निष्ठावंताचा आवाज दाबण्यासाठी हा हल्ल्याचा प्रकार केला असावा, अशी शंका आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. भ्याड हल्ला हा जिल्हयाचे पालकमंत्री यांचे विधानसभा क्षेत्रात घडला. त्यामूळे सदर गंभीर घटनेत पालकमंत्री लक्ष घालतील, अशी अपेक्षा होती. परंतु पालकमंत्री यांनी सदर प्रकरणात आजपर्यंत लक्ष घातल्याचे दिसत नाही. ही बाब खेदजनक असल्यानेे सदर प्रकरणाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचेकडे तक्रार करणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी सांगीतले.