पुणे : आमिषाने तब्बल साडेचार कोटींचा गंडा; 39 जणांची फसवणूक | पुढारी

पुणे : आमिषाने तब्बल साडेचार कोटींचा गंडा; 39 जणांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बोगस कंपनी स्थापन करून कंपनीच्या नावे विविध योजना जाहीर करून नागरिकांना लाखो रुपयांच्या रकमा ट्रेडिंग कंपनीत गुंतविण्यास भाग पाडून 39 जणांची तब्बल 4 कोटी 62 लाख 15 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीच्या मुख्य संचालकासह आठ जणांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

तर याप्रकरणी ए. एस. ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी या कंपनीचा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार, कंपनीचा आशिया मार्केटिंगचा प्रमुख तसेच पुण्यातील ऑफिस चालक अमर चौघुले, डायमंड ग्रुपचे व टेक्सट्रग व्हेन्चर्सचा प्रमुख भिकाजी कुंभार, पिलर व कॅपिटल सिक्रेट कंपनीचा प्रमुख बाबूराव हजारे, ए. एस. ट्रेडर्स डेव्हलपर्स अ‍ॅण्ड एलएलपी कंपनीचा पार्टनर व संचालक आदिनाथ पाटील, लोणावळा येथील फॅ्रन्चायजी चालक प्रदीप मड्डे व कंपनीचा मावळ व पुणे जिल्हा फॅ्रन्चायजी चालक संतोष वाजे अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मड्डे आणि वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत व्यावसायिक असलेले गुंतवणूकदार प्रकाश महालिंग खंकाळे (52, रा. शिवम बंगला, लेन नंबर 15, गारमाळ, धायरी, सिंहगड रोड) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 नंतर घडला. पोलिसांनी़ दिलेल्या माहितीनुसार, ए. एस. ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी कंपनीचा मुख्य संचालक सुभेदार आणि इतर सात जणांनी नागरिकांना फसवण्याच्या उद्देशाने बोगस ट्रेडिंग कंपनी काढली. त्या कंपनीच्या माध्यमातून विविध योजना जाहीर केल्या.

गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे, महागड्या गाड्या बक्षीस देण्याचे, विदेशात सहलीला नेण्याचे आमिष दाखवून विविध योजनांच्या नावे गुंतवणूकदारांकडून लाखोंच्या रकमा जमा करून काही दिवस त्यांना परतावा देण्याचे नाटक केले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यानंतर स्वीकारलेल्या रकमांवर कोणताही परतावा न देता किंवा रक्कम परत न करता 39 गुंतवणूकदारांची तब्बल 4 कोटी 62 लाख 15 हजार इतकी रक्कम परत दिली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील लोणावळा येथील फ्रॅन्चायजी चालक प्रदीप मड्डे व कंपनीचा मावळ व पुणे जिल्हा फॅ्रन्चायजी चालक संतोष वाजे या दोघांना अटक केली आहे.

Back to top button