बारसू प्रकल्पामध्ये सरकार दडपशाही करणार नाही : मुख्यमंत्री | पुढारी

बारसू प्रकल्पामध्ये सरकार दडपशाही करणार नाही : मुख्यमंत्री

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बारसू येथील प्रकल्पासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बुधवारी (दि.२६) चर्चा झाली आहे. उद्योगमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घ्यावे, ही त्यांची मागणी योग्यच आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीत दडपशाहीने हा प्रकल्प करणार नाही. लोकांना विश्वासात घेऊनच राज्‍य सरकार निर्णय घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२७) नागपूर येथे केले. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता सरकार बळजबरीने, लोकांवर अन्याय करून काहीही होणार नाही. शेतकरी, भूमिपुत्र या सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. सध्या या ठिकाणी बोअरवेलचे काम केले जात असून, माती परीक्षण होईल. त्यानंतर पुढच्या प्रक्रिया होतील. आज लगेच हा प्रकल्प उभा राहणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागपूर-मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. जनतेला शेतकऱ्यांना विश्वासात घेत आम्ही या प्रश्नावर पुढे गेलो. आज हा महामार्ग पूर्ण झाला आहे, यावर शिंदे यांनी भर दिला. शरद पवार यांनी आता ‘करपू नये म्हणून, भाकरी परतण्याची वेळ आली आहे’ असे सांकेतिक विधान देखील केल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यात नेतृत्व बदल होणार का? असा प्रश्न छेडला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत याचा अर्थ त्यांनाच विचारायला हवा. माझी त्यांची बुधवारी केवळ बारसू प्रकल्पातून येथील नागरिकांवर अन्याय होऊ नये; या दृष्टीने चर्चा झाली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करून सरकार स्थापन करणाऱ्यांचा सूड घेणार असे वक्तव्य केले. याविषयी विचारले असता, ‘ते रोजच बोलत असतात’ असे उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे टाळले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून नागपुरात सर्वोत्तम असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभे राहिले याची त्यांनी आवर्जून प्रशंसा केली. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल, किरण पांडव हजर होते. नागपूरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या उद्घाटनाचा आज (दि.२७) कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते.

हेही वाचा :

 

 

Back to top button