महाविकास आघाडीचं बिनसलं तर…; नाना पटोलेंनी दिले ‘हे’ उत्तर

महाविकास आघाडीचं बिनसलं तर…; नाना पटोलेंनी दिले ‘हे’ उत्तर

नागपूरः पुढारी वृत्तसेवा : भाजपविरोधात काँग्रेसची लढाई असून महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. पण आघाडी झाली नाहीच तर आमचे पुढचे सर्व प्लॅन तयार आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसचा दुसरा प्लॅन तयार आहे. एकप्रकारे गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसची ही भूमिका राष्ट्रवादी व ठाकरे गट यांना इशारा असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काही मुद्यांवर वेगळी भूमिका घेतली असल्याने आता काँग्रेसने देखील दबावतंत्र सुरु केल्याचे मानले जात आहे.

सध्या सुरु असलेल्या राजकारणावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात अनेक ठिकाणी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत, याकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री जनता ठरवते. आम्ही त्यावर भाष्य करणे योग्य नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचे कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल. महाराष्ट्रात चुकून लोकांनी भाजपला 105 आमदार दिले. महाराष्ट्रात कधी नव्हे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार निवडून देणे ही जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारावर प्यादे चालवण्याचे काम भाजप करीत आहे. मात्र, हे अधिक काळ चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news