मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवारांकडे १४५ चा आकडा आहे का? : नाना पटोलेंचा सवाल | पुढारी

मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवारांकडे १४५ चा आकडा आहे का? : नाना पटोलेंचा सवाल

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशा शब्दांत आपली राजकीय महत्वाकांक्षा एका मुलाखतीत जाहीर करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे? लोकशाहीत कुणालाही वाटू शकते मुख्यमंत्री व्हावे, पण मुख्यमंत्री व्हायला १४५ आकडा लागतो. हा आकडा अजित पवार यांच्याकडे असेल, तर मला माहित नाही. स्वप्न बघणे गैर नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२२) नागपुरात पत्रकारांशी बोलताना  दिली.

दरम्यान, काँग्रेसचा मुख्यमंत्री कधी होणार ? या प्रश्नावर पटोले म्हणाले, ते जनताच ठरविणार आहे. कोण संजय राऊत ? या दादांच्या वक्तव्याबाबत बोलण्यास पटोले यांनी तो त्यांचा प्रश्न असे सांगत नकार दिला. सध्या अजित पवार यांच्या विविध वक्तव्यांची बरीच चर्चा होत आहे. अजित पवार यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावर चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात काम करायला कुणी सांगितले होते, अशी पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

इतक्या ज्येष्ठ नेत्यांने असे बोलायला नको होते. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तुम्हाला काही गोष्टी आवडल्या नाहीत. तर त्याचवेळी बोलायला हवे होते. या शब्दांत पटोले यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button