नागपूर: देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, बुटीबोरी परिसरात झळकले बॅनर | पुढारी

नागपूर: देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, बुटीबोरी परिसरात झळकले बॅनर

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर -वर्धा महामार्गावर अगदी मोक्याच्या ठिकाणी बुटीबोरी परिसरात “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार”, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावलेले हे बॅनर आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. रोज मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत या फलकाने भर घातली. बबलू गौतम यांना छेडले असता जे जनतेच्या मनात तेच या बोर्डाच्या माध्यमातून लिहिले, असे समर्थन त्यांनी केले.

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री असले तरी भविष्यात फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असे राज्यातील जनतेला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कर्नाटक निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात लगेच प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी कोणी बॅनर लावले असतील, त्यांनी ते काढून टाकावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. काही अतिउत्साही लोक असे करतात, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री राहतील व त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू, असे फडणवीस यांनी पुन्हा एकदा यानिमित्ताने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण विविध कारणांनी चांगलेच ढवळून निघाले आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आणि राज्यातील शिंदे-भाजप सरकार कोसळणार असल्याचे दावे विरोधकांकडून सुरु आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बदलणार असल्याचे दावे सुरु केले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपण तीन दिवस गावाकडे जात असल्याचे सांगितल्याने यात अधिक भर पडली. दुसरीकडे अजित पवार हे भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री होतील, अशा चर्चाही जोरात सुरू आहेत. एकंदरीत राज्यात राजकारणाचा नवा अंक अद्याप बाकी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचा 

Back to top button