मोठी बातमी! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गुवाहाटीच्या मार्गावर : आशीष देशमुख यांचा गौप्यस्फोट    | पुढारी

मोठी बातमी! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गुवाहाटीच्या मार्गावर : आशीष देशमुख यांचा गौप्यस्फोट   

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सत्ताधाऱ्यांकडून महिन्याला एक खोका मिळत असावा. संभाजीनगरच्या मविआच्या सभेत पटोले गैरहजर राहिले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १६ एप्रिलपर्यंत गुवाहाटीच्या मार्गावर दिसतील असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पटोले नव्या सरकारच्या प्रमुखांबद्धल कधीच बोलताना दिसत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी केला आहे. देशमुख म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष पटोले हे उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन, असा दावा देशमुख यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला नाना पटोले गैरहजर राहिले, याकडे लक्ष वेधले असता देशमुख यांनी हे आरोप केले आहेत.
एका माध्यमाशी बोलताना आशीष देशमुख म्हणाले की, नाना पटोले हे ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. आपण ठणठणीत असून, दिल्लीला गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला बघायला मिळतील. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय, असा दावाही देशमुख यांनी केला. नागपूरला १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्याची कोणतीही जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली नाही. आमच्या दुसऱ्या नेत्यांवर त्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.

Back to top button