वाशिम: शहीद अमोल गोरे यांना अखेरची मानवंदना | पुढारी

वाशिम: शहीद अमोल गोरे यांना अखेरची मानवंदना

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : शहीद अमोल गोरे अमर रहे, भारत माता की जय, जब तक सुरज चाँद रहेगा, अमोल तेरा नाम रहेगा आणि वंदे मातरम् अशा घोषणा आणि शोकाकुल वातावरणात वाशिमजवळील सोनखास येथील सुपुत्र आणि पॅरा रेजिमेंटचे कमांडो अमोल गोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.१९) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुपारी ३.३० वाजता शहीद अमोल यांचे पार्थिव त्याच्या सोनखास या मुळगावी पोहचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले. त्यानंतर गावाजवळच असलेल्या अमोल यांच्या शेतात सायंकाळी ५.२० च्या सुमारास लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. शहीद अमोल यांचा चार वर्षाचा मुलगा मयूर याने पार्थिवाला मुखाग्नी दिला.

अरुणाचल प्रदेशात कमेंग व्हॅली येथे भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना अमोल गोरे यांना सोमवारी (दि.१७) वीरमरण आले होते. आज शहीद अमोल यांचे पार्थिव पुणे येथून सैन्याच्या वाहनाने सोनखास येथील त्यांच्या गावी आणण्यात आले. यावेळी वाशिम शहरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य मार्गांवरून शहीद अमोल यांची अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या पार्थिवावर नागरिकांनी पुष्प उधळून करून श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने आज बंद ठेवली होती.

शहीद अमोलचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयूर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, विवाहित बहिण उमेशा भिसडे यांनी पुष्पचक्र वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम. यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजयसिंग, भारतीय सैन्याच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button