Bee attack : लग्नसमारंभ आटोपून पर्यटनासाठी गेलेल्या पाहुण्यांवर मधमाशांचा हल्ला; दोघांचा मृत्यू | पुढारी

Bee attack : लग्नसमारंभ आटोपून पर्यटनासाठी गेलेल्या पाहुण्यांवर मधमाशांचा हल्ला; दोघांचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभ आटोपून पर्यटनांकरीता आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघेजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये सहा महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. शनिवारी (दि ८) रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील सातबहिणी (पेरजाजागड) डोंगरावर ही घटना घडली. मृतांमध्ये अशोक बिबीसन मेंढे (वय ६४, रा. भिलगाव, नागपूर), गुलाबराव केशव कोचे (वय ५८, रा. लोधीखेडा, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. पंधरा दिवसात मधमाशांनी हल्ला केल्याच्या तीन घटना सातबहिणी डोंगरावर घडल्या आहेत.  

याबाबत अधिक माहितीनुसार, नागभिड तालुक्यातील वाढोणा येथील अशोक भशाखेत्री यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या लग्नसमारंभाकरिता अशोक मेंढे (रा. भिलगाव, नागपूर) व गुलाब कोचे (रा. लोधीखेडा, मध्यप्रदेश) हे दोघे आलेले होते. विवाहसमारंभ आटोपल्यानंतर शनिवारी गावाकडे परत जाण्यापूर्वी ते पर्यटनासाठी निघाले. चारचाकी वाहनाने ते नागपूरमधील गोविंदपूर गावाजवळील सोनापूरच्या सातबहिणी (पेरजागड) डोंगरावर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गेले. त्यानंतर काही वेळाने पती, पत्नी व ६ महिन्याच्या चिमुकलीला घेऊन हे काही नातेवाईक सातबहिणी डोंगरावर पोहचले. याचदरम्यान या ठिकाणी नागपूर येथील आणखी एक दाम्पत्याचे कुटुंब पर्यटनाकरीता आलेले होते. हे सर्वजण डोंगर चढत असताना अचानकपणे मधमाश्यांच्या पोळ्यातील माश्या उडाल्या आणि त्यांनी सर्वांवर हल्ला केला.

नागपूरातील दाम्पत्यांच्या लहान मुलीसह आईला मधमाश्यांचा हल्ला

सातबहिण डोंगरावर सर्वात पहिल्यांदा वर गेलेला नागपूरचा परिवार कसाबसा जिव वाचवित डोंगरावरून खाली उतरला. त्यामध्ये मुलीला व तिच्या आईला मधमाश्यांनी किरकोळ चावा घेतल्याने ते जखमी झाले. लगेचच त्यांनी डोंगरावरून थेट गोविंदपूर गाव गाठले आणि एका खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करून ते नागपूरला परत निघाले.

लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर आक्रमक मधमाश्यांचा हल्ला

आक्रमक झालेल्या मधमाश्यांच्या तडाख्यात अशोक मेंढे व गुलाब कोचे हे सापडले. दोघेही डोंगरावरील कळसाजवळ पोहचले होते. त्यामुळे मधमाश्या दोघांवर तूटून पडल्या. मोठ्या प्रमाणात मधमाश्यांनी चावा घेतल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात असलेल्या मधमाश्यांच्या तडाख्यातून ते खाली उतरू शकले नाहीत. संपूर्ण शरीरावर बसून मधमाश्यांनी त्यांना चावा घेतल्याने ते त्याच ठिकाणी पडून राहिलेत. मागून आलेले पती पत्नी व चिमुकल्याला घेऊन त्यांचेच नातेवाईक डोंगर चढत असताना मधमाश्यांचा घोळखा खालच्या दिशेने घोंघावत आला. त्यामध्ये पत्नी व चिमुकल्या मुलीला चावा घेतल्याने दोघीही किरकोळ जखमी झाल्यात. मधमाश्यांचा हल्ला कसाबससा परतवून त्या डोंगरावरून खाली उतरल्या आणि गोविंदपूर गावात गेल्या. त्या ठिकाणी एका खासगी डॉक्टरांकडे उपचार करवून घेतला आणि या घटनेची माहिती गावात दिली.

डोंगराच्या मध्यभागी ‘त्या’ दोघांचा मृतदेह

लगेच तळोधी पोलिस व वनविभागाला माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे यांचे मार्गदर्शनात  पोलिस उपनिरीक्षक आकाश साखरे यांचे नेतृत्वात तसेच नागभिड, तळोधी, सिंदेवाही पोलिस कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशन दल दुपारी तीन वाजताचे सुमारास सातबहिणी डोंगरावर पोहचला. त्यानंतर मधमाश्यांच्या तावडीत असलेल्या दोघांना सोडविण्याकरीता रेस्क्यू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू चालले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमक दल यांनी डोंगराच्या दिशेन कुच केली. डोंगराच्या मध्यभागी एका ठिकाणी दोघेही व्यक्ती पडलेले. त्यांच्या अंगासभोवती मधमाश्यांचा घोळखा लागलेला होता. दोघांचाही जागीच मृत्यू झालेला होता. यावेळी मधमाश्या शांत झालेल्या होत्या. त्यामुळे लगेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषीत करण्यात आले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरीता नागभिड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.

सातबहिणी डोंगरावरील पंधरवाड्यात तिसरी घटना

विदर्भात सर्वांत उंच  डोंगर म्हणून सातबहिणी (पेरजागड) ची नोंद आहे.  पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. या परिसरातील घोडाझरी पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर पर्यटक सातबहिणी पेरजागडाकडे वळतात.  घनदाट जंगलात सोनापूर गावाच्या पायथ्याशी हा डोंगर आहे. नैसर्गीक दृष्ट्या पर्यटकांना भूरळ घालणारा हा परिसर आहे. डोंगरावरून दऱ्याखोऱ्यांची डोंगराची मोहकता अधिकच दिसून येते. त्यामुळेच पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागील पंधरवाड्यात मधमाश्यांच्या हल्यात जखमी होण्याच्या तिन घटना घडल्या आहेत.  नागपूर येथील काही मित्र मंडळी पर्यटनाकरीता आले असता दोघांना मधमाश्यांनी गंभीर जखमी केले होते. त्यानंतर पून्हा काही पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. यावेळी पर्यटक जखमी झाले होते. त्यांनतर काल शनिवारी मधमाश्यांच्या हल्यात दोघांचा मृत्यू तर चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button