वर्धा: सेलगाव, चिंचोली परिसराला अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून दोन बैल ठार | पुढारी

वर्धा: सेलगाव, चिंचोली परिसराला अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून दोन बैल ठार

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वादळ वाऱ्यासह गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. यादरम्यान वीज कोसळून दोन ठिकाणी बैलांचा मृत्यू झाला. त्यात देवळी तालुक्यातील पिंपळगाव येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. तर सेलू तालुक्यातील सोंडी येथे वीज पडून बैल दगावला. यात शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सेलगाव, चिंचोली परिसरात गारपीट, वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सेलगाव येथील शेतीतील संत्राची ३९ झाडे उन्मळून पडली. तर चिंचोली येथे काकडी, कोहळा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. याशिवाय वर्धा जिल्ह्यात इतरही भागात भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

कारंजा तालुक्यातील अनेक भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाले. कृषी विभागाच्या चिंचोली मुख्यालय परिसरातील सेलगाव उमाटे परिसरात संत्रा, काकडी आदी पिकांचे नुकसान झाले. सेलगाव उमाटे येथील शोभा विठ्ठल गाडरे यांच्या शेतातील तब्बल ३९ संत्र्यांची झाडे जमीनदोस्त झाली. याच परिसरातील दिवाकर गाडरे, दीपक चौधरी यांच्या शेतातील काकडी पिकांचे नुकसान झाले. कारंजा येथील कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली मुख्यालय परिसरात शेती पिकाच्या नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला आहे. यावेळी कृषी सहाय्यक निलेश डोईफोडे, कोतवाल नंदकिशोर सोनुले यांनी सेलगाव परिसरातील शेत नुकसानीचा पंचनामा केला.

हेही वाचा 

Back to top button