नागपूर: पुढारी वृत्तसेवा : उपचाराच्या नावाखाली पोलिसांना दीर्घकाळ हुलकावणी देणारा ठगबाज, स्वयंघोषित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे याला अखेर पोलिसांनी सात महिन्यानंतर अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एकीकडे तो सतत आजारी असून उपचार सुरू असल्याच्या बहाण्याने पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा चुकवित होता. त्याचवेळी अटकपूर्व जामिनासाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारला. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे, पारसे पोलिसांची चौकशी आणि अटकही टाळत होता. यावरून त्याला राजाश्रय असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
अजित पारसे याने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयासाठी परवानगी मिळवून देण्याचे अमिष दाखवून डॉ. राजेश मुरकुटे यांची तब्बल ४.३६ कोटींची फसवणूक केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, चौकशीमध्ये त्याने अनेकांना सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून गंडविले असल्याची बाब समोर आली होती. याशिवाय एक अन्य डॉक्टर आणि ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाची फसवणूक केल्याचेही समोर आले. तपासात त्याने पंतप्रधान कार्यालय आणि सीबीआयचे लेटरहेड तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हे प्रकरण तपासणीसाठी युनिट २ कडे वर्ग करण्यात आले होते.
मात्र, सातत्याने आजारी असल्याची कारणे सांगून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयातही धाव घेतली. सत्र न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर पारसेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यातही त्याने गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याचे कारण समोर करून पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याची बाब समोर केली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावल्याने बुधवारी त्याला अटक केली.
हेही वाचा