नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेतर्गत नागपुरात ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येणार असून या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येणार आहे.
यामध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ किमी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटीव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५किमी). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० किमी) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरवात झाली होती. यामध्ये ४०.०२ किमी लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे. पंतप्रधान येत्या 27 एप्रिल रोजी कोराडी, नागपूर दौऱ्यावर येत असल्याने मेट्रो टप्पा 2 चा देखील विविध विकास कानांसोबत श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे.