सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा तडाखा; पाच दिवस वार्‍यासह हलक्या पावसाची शक्यता | पुढारी

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा तडाखा; पाच दिवस वार्‍यासह हलक्या पावसाची शक्यता

कुडाळ/नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आर्द्रतेतील घटीबरोबर हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला असल्याची माहिती मुळदे कृषी केंद्राने जाहीर केलेल्या हवामानात आधारित कृषी सल्ल्याद्वारे दिली आहे. पावसाच्या सावटामुळे आंबा, काजू उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी कासार्डे परिसरात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचे काही काळ आगमन झाले. यामुळे परिसरात धांदल उडाली.कणकवली, नांदगाव व जिल्ह्याच्या अन्य परिसरात तुरळक पाऊस व पावसाचे वातावरण निर्माण झाले होते.

एप्रिल महिना म्हणजे फुल हिट असेच चित्र असते. सद्यस्थितीतही तापमानात बरीच वाढ झाली आहे. दिवसभरात 34 ते 36 सेल्सिअस एवढे तापमान असते. यामुळे वाढत्या तापमानामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. तापमानातील ही वाढ जीव नकोशी करणारी आहे. अशा स्थितीतच आता हवामान विभागाने पर्जन्यमानाचे संकेत दिले आहेत. यानुसार 8, 9 व 10 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. 11 एप्रिल रोजी पर्जन्यमान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानामध्ये क्रमशः 2 ते 3 अंशाची वाढ तर किमान तापमानामध्ये कोणतीही चढ उतार न होता ते अनुक्रमे 34 ते 36 व 21 ते 22 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेबरोबर हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Back to top button